नांदेड(प्रतिनिधी)-वाळकी ता.हदगाव येथे घरात प्रवेश करून एका 75 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरी चोरण्यात आली आहे. असाच काहीसा प्रकार मौजे कोपरा ता.हदगाव येथे घडला. येथून 23 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने नेला आहे. अर्धापूर येथे दोन घरफोड्यांमध्ये 8 लाख 64 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
हदगाव तालुक्यातील वाळकीच्या राहणाऱ्या रेणुकाबाई विठ्ठल सावदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जूनच्या रात्री 1.30 वाजता कोणी तरी अज्ञात लोकांनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्यातील 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
मौजे कापरा ता.हदगाव येथील शेख इब्राहिम शेख नबीसाब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 जूनच्या रात्री 11.45 वाजता कोणी तरी अज्ञात माणसाने प्रवेश करून त्यांच्या घरातील लोखंडी कपाट फोडले आणि त्यातून रोख रक्कम व पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र असा 23 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक किरवले अधिक तपास करीत आहेत.
गजानन रुखमाजी पिंपळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अर्धापूर नांदेड रस्त्यावर देशमुख पेट्रोलपंपाजवळ त्यांचे टायरचे दुकान आहे. 9 जूनच्या रात्री 12. ते 10 जूनच्या पहाटे 9 वाजेदरम्यान त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील टीनपत्रे वाकवून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या दुकानातील विविध कंपन्यांचे 3 लाख 84 हजार 292 रुपयांचे टायर चोरून नेेले आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक दळवे अधिक तपास करीत आहेत.
गौतम नारायण वाठोरे हे 9 जून रोजी आपल्या चार चाकी माल वाहु गाडी क्रमांक एम.एच.22 ए.एन.0739 मध्ये बसून धर्माबाद ते वालूर असा प्रवास करत असतांना 9 जूनच्या सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास ते मालेगाव रस्त्याजवळ डॉक्टर बंडेवार यांच्या शेताजवळ थांबले होते. तेवढ्यात दोन लोकांनी त्यांच्या जवळ येवून त्यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला आणि त्यांच्या गाडीत हळद विक्री करून जमा केलेले 4 लाख 80 हजार रुपये चोरून नेले. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सुरवसे अधिक तपास करीत आहेत.
बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 70 हजार रुपये किंमती, नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 8 हजार रुपये किंमतीची आणि किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 15 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या संदर्भाने सुध्दा तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
10 लाखांचा ऐवज लंपास ;दोन जबरी चोर, दोन घरफोड्या, तीन दुचाकी चोऱ्या