माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द देगलूरमध्ये गुन्हा दाखल; एकाला अटक

नांदेड(प्रतिनिधी)-उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना खर्चाबाबत अनेकदा माहिती अधिकार कायद्याचे अर्ज देवून मागील सहा वर्षांची निधी उपलब्धता आणि खर्चा माहिती मागून त्यानंतर 10 लाख रुपयांची खंडणी आणि नंतर 5 लाख रुपये कमी करून 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकाला अटक केली आहे. अशा परिस्थितीत माहिती अधिकार कायद्याचा असा सदउपयोग करणाऱ्यांविरुध्द आता तरी जनतेने, सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तक्रारी देण्याची गरज आहे.

देगलूर येथील उपजिल्हाधिकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.शिवशंकर शिवराम वलांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 2020 पासून उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे वैद्यकीय अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार आकाश विठ्ठलराव देशमुख रा.देगलूर कॉलेजसमोर याने मागील 6 वर्षात उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे आलेला खर्च कोठे आणि किती करण्यात आला अशी विचारणा केली. कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना माहितीही पुरविण्यात आली. आकाश विठ्ठलराव देशमुख सोबत त्याचा साथीदार सुगत केरुरकर यास सुध्दा माहिती देण्यात आली. आकाश देशमुखने माहिती प्राप्त केल्यानंतर माझी डॉ.सचिन रावीकर, डॉ.संभाजी पाटील, डॉ.आर.एच.शेख आणि सहाय्यक अधिक्षक डॉ.बळीराम शेळके यांच्याविरुध्द कार्यवाही करा अन्यथा उपोषण करील असा तक्रारी अर्ज जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्याकडे दिला. याबाबत एक चौकशी समिती स्थापन झाली. त्या चौकशी समितीने किरकोळ त्रुटी निघाल्याने त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला. त्यानंतर आकाश देशमुखने उपसंचालक कार्यालय लातूर व संचालक कार्यालय मुंबई येथे तक्रारी अर्ज करून उपोषणास बसण्याची धमकी देवून दबाव तंत्राचा वापर केला.

यानंतर अर्जदार आकाश देशमुख व त्याचा मित्र सुगत केरुरकर हे दोघे 23 मार्च 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे आले आणि मी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारी अर्जासंदर्भाने काय माहिती आली अशी विचारणा केली. तेंव्हा आम्ही काहीच माहिती प्राप्त झाली नाही असे सांगितले. यावेळी मी सहाय्यक अधिक्षक बळीराम शेळके यांना आकाश देशमुख वारंवार माहिती अधिकाराचे अर्ज करतो त्याचे काय म्हणणे आहे ऐकून घ्या असे सांगितले. शेळके, देशमुख आणि केरुरकर तेथून निघून गेले.

त्यानंतर देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे या तिघांनी चहा घेतला आणि शेळके यांनी देशमुख आणि केरुरकरला विचारले की, तुमच्या माहिती अधिकार अर्जात सार्वजनिक हित नाही तरी वारंवार माहिती मागत आहात. त्यावेळी सुगत केरुरकरने यापुढे माहिती अधिकार अंतर्गत माहिती न मागण्यासाठी व डॉ.सचिन रावीकर, डॉ.संभाजी पाटील, डॉ.आर.एच.शेख यांच्याविरुध्द उपोषणाला बसणार नाही यासाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या डॉक्टरांवर दंडात्मक कार्यवाही बाबतचा पत्र व्यवहार करणार नाही यासाठी आकाश देशमुखने 10 लाख रुपये मागितल्याचे सांगितले. याबाबत एवढी रक्कम आम्हाला देता येणार नाही असे आम्ही उत्तर दिले.  त्यानंतर दि.9 जून 2022 रोजी मी स्वत: डॉ.सचिन रावीकर, डॉ.संभाजी पाटील आणि बळीराम शेळके हे नांदेड येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात आलो असतांना आमची आणि आकाश देशमुखची भेट झाली. त्यावेळी त्यांनी इतर डॉक्टरांना सांगितले की, दहा लाखांऐवजी 5 लाख रुपये द्या. या तडजोडी अंतर्गत आमच्यावर त्रास देणाऱ्याविरुध्द कार्यवाही व्हावी.

देगलूर पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 288/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 385, 34 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणातील आकाश विठ्ठलराव देशमुख (30) या आरोपीला पोलीसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे हे करत आहेत.

माहिती अधिकार कायदा आला त्यावेळी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पारदर्शक आणि खरे काम करावे लागेल असाच त्या कायद्याचा अर्थ होता. पण पुढे या कायद्याला वेगळेच स्वरुप प्राप्त झाले. यात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा आपल्या भ्रष्टाचारातील हिसा आहे असा समज करून घेतला पण यामुळे चांगले काम करणाऱ्यांना त्रास झाला आणि हा त्रास चांगले काम करतांना माणुस म्हणून होणाऱ्या चुकांसाठी घातक ठरला आणि त्याचा असा वापर सुरु झाला. आता तरी माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे त्रास होवू अशी परिस्थिती ज्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर तयार होत आणि त्यांनी याबद्दल दाद मागितली पाहिजे. दाद मागत असतांना आपण स्वत: सुध्दा स्पष्ट आणि पारदर्शक असावे याची जाणिव सुध्दा ठेवायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *