नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये किनवट तालुक्यातील चिखली वनक्षेत्रात वनरक्षकांना जबर मारहाण करून सागवान लाकुड चोरणाऱ्या पाच जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 5 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकास 5 हजार 750 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सुनिल दिगंबर खामकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.24 जानेवारी 2017 रोजी सुर्योदय होण्याअगोदर पहाटे 4.30 वाजता त्यांना माहिती प्राप्त झाली की, चिखली या सुरक्षीत वनक्षेत्रात सागवानाच्या लाकडांची चोरी होत आहे. माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक रवि दांडेगावकर, रमेश राठोड, वनपाल पांडूरंग धोंडगे आणि वनमजुर लक्ष्मण शिंदे असे चिखली (बु) जंगलात पोहचले. तेथे कांही जण सागवानाची लाकडे खांद्यावर आणि सायकलवर घेवून जातांना दिसले. ही झाडे कोठून आणली अशी विचारणा केली असता त्यांनी झेेंडीगुडा येथून चोरून आणल्याचे सांगितले. वनरक्षकांना पाहुन सागवान लाकुड तोडत्यांनी आपल्या हातातील लाकडे खाली टाकली आणि आपसात संगणमत करून सर्वांनी वनविभागाच्या लोकांना जबर मारहाण केली. अशा प्रकारे दहशत पसरवून ते पळून गेले त्यावेळी 14 हजार 780 रुपयांची सागवान झाडे तेथे सापडली. सोबतच त्यांनी सागवान झाडांच्या विहित वेळेअगोदर तोडून 50 हजार रुपयांचे नुकसान केले होते.
या तक्रारीनुसार किनवट पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 395, 353, 332, 136 नुसार गुन्हा क्रमांक 21/2017 दाखल केला. या गुन्ह्यामध्ये शेख कलीम शेख कासीम (40), शेख युनूस शेख महेबुब (24), शेख वसीम शेख हुसेन (22), शेख शमशोद्दीन उर्फ शम्मी शेख अवनाक(39) आणि शेख जाकीर शेख अब्दुल (37) सर्व रा.चिखली (बु) ता.किनवट जि.नांदेड यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द संपुर्ण तपास करून किनवटचे पोलीस निरिक्षक डॉ.अरुण जगताप यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी नांदेड जिल्हा न्यायालयात झाली. न्यायालयाच्या प्रक्रियेत उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार न्यायाधीश एस.ई.जगताप यांनी पाच आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 395 नुसार पाच वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंड तसेच भारतीय दंड संहितेच्या 353 नुसार पाच वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार दंड तसेच कलम 336 नुसार तीन महिने सक्त मजुरी आणि इतर कलमांसाठी शिक्षा आणि 1 हजार 750 रुपये दंड असा एकूण 5 हजार 750 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सर्व शिक्षा आरोपींना सोबत भोगायच्या आहेत. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी.एम.हाके यांनी सरकार पक्षाच्यावतीने सादरीकरण केले. आरोपीच्यावतीने ऍड. गणेश जांमकर यांनी काम पाहिले. या खटल्यात किनवट येथील पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार भगवान महाजन आणि एस.एस.ढेंबरे यांनी पैरवी अधिकाऱ्याच्या भुमिकेत आपली जबाबदारी पार पाडली.
सागवान लाकडे तोडून वनरक्षकांवर हल्ला करणाऱ्या पाच सागवान चोरांना पाच वर्ष सक्तमजुरी