नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनाला कधी काय कलाटणी मिळेल याचा कांही एक नेम नसतो आणि असाच एक प्रकार कांकाडी शिवारात 18 जूनच्या सूर्योदयापुर्वी घडला. एका उदयोन्मुख ट्रक मालकाचा लुटारूंनी केला आहे.
इंदौर येथील गोपाल अमरसिंह राठोड (33) हे ट्रक चालक आणि मालक आपल्या लहान भावाला घेवून इंदौर ते हैद्राबाद असे भाडे आपल्या ट्रकमध्ये भरले आणि 17 जूनला हैद्राबाद येथे पोहचले. 17 जूनला तेथील साहित्य रिकामे करून त्यांनी पुन्हा हैद्राबाद ते इंदौर असे साहित्या त्या ट्रकमध्ये भरले आणि पुन्हा इंदौरकडे प्रवासाला निघाले. त्यांच्यासोबत त्यांचा लहान भाऊ आणि क्लिनर लक्ष्मणसिंह अमरसिंह राठोड हे पण होते. त्यांचा ट्रक पहाटे 4 वाजेदरम्यान नांदेड जिल्ह्याच्या कांकाडी शिवारात पोहचला. त्यावेळी लक्ष्मणसिंह राठोड हे झोपलेले होते. गोपाल राठोड मी नैसर्गिक विधीसाठी जात आहे असे छोट्या भावाला सांगितले तो झोपेतच होता. पहाटे 6 वाजता लक्ष्मणसिंह राठोडला जाग आली. ट्रक उभा दिसला. लक्ष्मणसिंह खाली उतरला. आसपास भावाचा शोध घेतला. तेंव्हा बालाजी पेट्रोलीयम या पेट्रोलपंपाशेजारी शेतात आपले मोठे बंधू गोपाल अमरसिंह राठोड यांचा मृतदेह लक्ष्मणसिंहने पाहिला आणि त्याने हंबर्डा फोडला. घडलेला प्रकार पोलीसांना सांगितल्यानंतर नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलीस फौजफाटा तेथे पोहचला. मयत गोपाल राठोडच्या छातीवर, पोटावर आणि शरिरावर इतर ठिकाणी धार-धार शस्त्राने जखमा करून त्याचा खून करण्यात आला होता. नांदेड ग्रामीण पोलीसांनी लक्ष्मणसिंह अमरसिंह राठोड रा.चॉंदमारी इटभट्टा धाररोड इंदौर (मध्यप्रदेश) याच्या तक्रारीवरुन कोणी तरी अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी गोपाल अमरसिंह राठोडचा खून केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 362/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्र्वजित कासले हे करीत आहेत.
आपला मोठा भाऊ आपल्यासमोर मृतावस्थेत पाहिल्यावर छोट्या भावाचे दु:ख शब्दात लिहिण्याइतपत ताकत आमच्याही लेखणीत नाही. आज पहाटे मध्यप्रदेश येथील त्यांचे इतर नातेवाईक नांदेडला आले. त्यात मयत गोपाल राठोडचा दहावर्षीय बालक आणि त्याचे दु:ख पाहुन प्रत्येकाला गहीवरून आले. पोलीसांनी त्यांच्या दु:खात खारीचा वाटा उचलला आणि त्वरीत प्रभावाने सर्वात अगोदर साहित्य भरलेला ट्रक इंदौरकडे रवाना केला. त्यानंतर वैद्यकीय प्रक्रिया पुर्ण झाली आणि पोलीसांनी गोपाल राठोडचे प्रेत इंदौरला पाठविण्यासाठी शववाहिनीची सुध्दा तडजोड लावली. आपल्या घरातील कर्ता असलेला गोपाल राठोड काळाने त्यांच्याकडून हिरावून घेतला. 15 वर्ष इतरांच्या ट्रकवर क्लिनर आणि ड्राइव्हर म्हणून काम केलेल्या गोपाल राठोडने आपल्या ताकतीवर दोन वर्षापुर्वीच स्वत:चा ट्रक घेतला होता आणि आपल्या लहान भावाला सुध्दा सोबत घेवून आपल्या कुटूंबाला उच्चतेकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण दुर्देवाने त्याचा घात केला आणि अर्ध्यावर डाव मोडून तो निघून गेला. त्याचा खून करणाऱ्यांनी आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी त्याच्या कुटूंबाला उघड्यावर पाडले. मृत्यूची किंमत किती हे यावरून दिसले. एखाद्या व्यक्तीला मारणे हा किती पोरखेळ झाला आहे हे पाहिल्यावर जग कोठे पोहचले हे पाहुन दु:ख होते. प्राथमिक दृष्ट्या कोणी तरी मारेकऱ्यानी याच्याकडे कांही तरी असेल हे लुटून घेण्याच्या दृष्टीकोणातून त्याच्यावर हल्ला केला असावा त्याने केलेल्या विरोधात गोपाल राठोडला स्वत:चा जीवी गमावा लागला. प्रसिध्द गायक अरुण दाते म्हणतात, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. पण प्रेम करण्याअगोदरच जीवन संपले तेव्हा सुरेश भट आठवतात माझ्याच माणसांनी मलाच जाळले असे ते आपल्या कवितेतून सांगतात. पोलिसांनी गोपाळ राठोरच्या अज्ञात मारेकऱ्यांना जेरबंद करून त्यांना शिक्षेपर्यंत पोहचवण्यासाठी आपली शक्ती लावावी अशीच अपेक्षा आहे.