नांदेड(प्रतिनिधी)-बियाणी हत्याकांड प्रकरणात आज 12 आरोपींची मकोका पोलीस कोठडी संपल्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस फौजफाट्याने एकूण 13 आरोपी मकोका न्यायालयात हजर केले. त्यातील दोघांची पोलीस कोठडी वाढवून मागितली आणि इतरांना न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केली. विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दोन जणांना चार दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर 55 व्या दिवसापासून त्यांच्या हत्येतील कटात सहभागी लोकांना पकडणे सुरू झाले. त्यात पोलीसांनी एकूण 12 जणांना अटक केली. त्यांच्याविरुध्द मकोका कायदा जोडला गेला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्याकडे वर्ग झाला. अर्चित चांडक यांनी 15 जून रोजी एकूण 12 आरोपींना न्यायालयात हजर करून मकोका कायद्यान्वये त्यांची पोलीस कोठडी मागितली होती. ती न्यायालयाने 20 जून पर्यंत मंजुर केली होती. आज इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर(35) रा.चिखलवाडी नांदेड,मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे (25) रा.नाईकनगर नांदेड, सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल(28) रा.शहीदपुरा नांदेड ,हरदिपसिंघ उर्फ सोनु पिनीपाणा सतनामसिंघ बाजवा (35) रा.रामदास यात्रीनिवास नांदेड,गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल (24) रा.शहीदपुरा नांदेड ,करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहु (30) रा.बढपुरा नांदेड ,हरदिपसिंघ उर्फ हार्डी उर्फ लक्की बबनसिंघ सपुरे (28) रा.मराठवाडा एकजुट प्रेसजवळ नांदेड, कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार (28) रा.आमदुरा नांदेड, हरीश मनोज बाहेती (28) रा.मारवाडगल्ली वजिराबाद नांदेड , राजपालसिंग ईश्र्वरसिंग चंद्रावत (29) रा.रत्नीया खेडी पोस्ट रुपेटा तहसील नागदा जि.उज्जैन (मध्यप्रदेश), योगेश कैलाशचंद भाटी (30) रा.दुर्गापूरा बिरला ग्राम नागदा जि.उज्जैन (मध्यप्रदेश),रणजित सुभाष मांजरमकर (25) रा.पौर्णिमानगर नांदेड या 12 जणांनासह 13 वा आरोपी सरहान चाऊस आलं कसेरी (42) रा. इतवारा नांदेड यास जोडून न्यायालयात हजर करण्यात आले.
या 13 पैकी रणजित सुभाष मांजरमकर आणि आज न्यायालयात हजर केलेला सरहान चाऊस आलं कसेरी यास पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी विनंती करण्यात आली. त्यातील रणजित मांजरमकरने बियाणीच्या घराची रेकी करून ती हल्लेखोरांना पुरावली होती. आज हजर केलेला आरोपी सरहान चाऊस आलं कसेरी याच्या गाडीवर बसूनच मारेकऱ्यांनी बियाणीचा पाठलाग केला होता आणि त्यांच्या घरासमोरच त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. युक्तिवाद ऐकून न्या.एस.इ.बांगर यांनी मांजरमकर आणि चाऊसची पोलीस कोठडी 4 दिवस अर्थात 24 जून 2022 पर्यंत वाढवून दिली आहे. या प्रकरणात बऱ्याच जणांचे जबाब पोलीसांनी न्यायालयासमक्ष फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 प्रमाणे नोंदवून घेतले आहेत अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे. हे सर्व या हत्याकांडातील साक्षीदार आहेत.