नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर त्यांच्या वारसाप्रमाणपत्रामध्ये एका महिलेने आपला आणि आपल्या मुलीचा आक्षेप दाखल केला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 24 जून 2022 रोजी होणार आहे.
संजय बियाणी यांच्या हत्येनंतर कायद्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक असलेले वारसाप्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता संजय बियाणी, मुलगा राज संजय बियाणी, लग्ना झालेल्या मुली पायल मयुर मंत्री आणि नेहा शुभम चिचाणी या चौघांच्यावतीने संजय बियाणी यांचे वारसदार आम्ही आहोत त्याबद्दल आम्हाला वारसा प्रमाणपत्र मिळावे म्हणून नांदेड जिल्हा न्यायालयात सीव्हील एम.ए.क्रमांक 736/2022 दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये ज्या-ज्या संपत्ती संजय बियाणी यांच्या आहेत. त्यांच्या बाबत योग्य पुरावा घेवून त्याचा निर्णय न्यायालय देत असते आणि तसे वारसा प्रमाणपत्र वादींच्या नावे मिळत असते. अनिता बियाणी आणि इतरांतर्फे या वारसा प्रमाणपत्राचा वाद न्यायालयात ऍड. पुरूषोत्तम भक्कड यांनी दाखल केलेला आहे.
वारसा प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमध्ये पहिली सुनावणी 21 एप्रिल 2022 रोजी झाली. त्यानंतर या न्यायालयीन प्रक्रियेत एक जाहीर प्रगटन दिले जाते. आणि त्यात कोणाला आक्षेप आहे का अशी विचार होते. जाहीर प्रगटन वर्तमानपत्रात आल्यानंतर लोहा येथील महिला दुर्गा संजय बियाणी यांनी आपला आणि आपली मुलगी श्रध्दा संजय बियाणी यांच्या नावाने या प्रकरणात आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात दुर्गा संजय बियाणी यांचे वकील लातूर येथील आहेत अशी माहिती प्राप्त झाली. 18 जून रोजी सुनावणी होती. त्यावेळी दुर्गा संजय बियाणी यांच्या वतीने दुर्गा आणि श्रध्दा यांच्या नावाचे आधार कार्ड न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जून 2022 रोजी होणार आहे.
संजय बियाणी यांच्या मृत्यूनंतर 55 दिवसांनी त्यांच्या हत्येचा कट करणारे पहिल्यांदा पकडले. आजही संजय बियाणी यांच्यावर गोळी झाडणारे दोन अजून पोलीसांच्या कक्षेबाहेर आहेत. आजच्या परिस्थितीत या प्रकरणात एकूण 12 जणांविरुध्द मकोका कायदानुसार कार्यवाही सुरू आहे त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. पण संपत्तीचा वाद सुध्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून या प्रकरणात सुध्दा दोन महिलांनी संजय बियाणी माझे पती होते असा दावा आणि त्यात आक्षेप दाखल केला आहे.
संजय बियाणी यांच्या वारसदार प्रकरणात दुसऱ्या महिलेचा आक्षेप दाखल ; पुढील सुनावणी 24 जून रोजी