नांदेड(प्रतिनिधी)-शेत गट क्रमांक 136 मधील 99 आर जमीन आजच्या दराप्रमाणे एक कोटी रुपयांची अशी ती शेत जमीन बनावट पावतीच्या आधारे आपलीच असल्याचे दाखवणाऱ्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.बी.राजा यांनी दोन दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आलेला आहे.या बाबतच्या तक्रारीची चौकशी बरेच दिवसांपासून आर्थिक गुन्हा शाखेकडे सुरु होती.
सुरेश गणेश रुद्रकंठवार रा.किल्ला रोड सराफा नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीच्या नावे मौजे असर्जन येथे शेत गट क्रमांक 136 मधील 0.99 आर जमीन आजच्या शासकीय दराप्रमाणे जवळपास 1 कोटी रुपये किंमतीची राजाराम मारोतराव येवले रा.जानापूर ता.लोहा याने दि.09 मार्च 2017 रोजी बनावट सौदाचिठ्ठी आणि दि.27 डिसेंबर 2017 रोजी पैसे दिल्याची बनावट पावती तयार करून आमची फसवणूक केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 373/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 आणि 474 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हा शाखेने फसवणूक करणारा व्यक्ती राजाराम मारोतराव येवले यास अटक केली. आज दि.22 जून रोजी आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक माणिक बेदरे,पोलीस अंमलदार दिलीप जाधव,तुकाराम कांगणे,बालाजी पवार,शेख रब्बानी यांनी राजाराम येवलेला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. श्रीकांत भोजने यांनी न्यायालयात पोलीस कोठडी देणे कसे गरजेचे आहे याचे सादरीकरण केले. त्यात बनावट सौदा चिट्ठी कोठे तयार केली,रक्कम दिलेली बनावट पावती जप्त करणे आहे,यात मदतगार कोण कोण आहेत,हस्ताक्षर नमुने तपासणी करणे आहे आदी मुद्यांचा समावेश होता. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश आर.बी. राजा यांनी राजाराम मारोतराव येवलेला 2 दिवस अर्थात 24 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.