
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गवळीपुरा भागातून 10 जून रोजी 14 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. वजिराबाद गुन्हे शोध पथकाने 13 व्या दिवशी हा चोर शोधला. घराची मालकीनच या प्रकरणात चोर निघाली. पोलीसांनी फिर्यादीच्या 25 वर्षीय पत्नीला अटक केली आहे.
दि.10 जून रोजी फय्युम अब्दुल गफार कुरेशी यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 8 जून रोजी ते आणि त्यांचे कुटूंबिय हिंगोली नाका जवळील दर्वेशनगर भागात आपल्या कुटूंबातील एका व्यक्तीच्या घरी कार्यक्रमाला गेले असतांना त्यांच्या घराचे लॉकर कोणी तरी चोरट्यांनी 8 जूनच्या रात्री 10.40 ते 9 जूनच्या मध्यरात्री 1 वाजेदरम्यान तोडले. त्यातील 13 लाख रुपये रोख रक्कम सोन्याचे गलसर, पत्ता, अंगठी असा एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. वजिराबाद पेालीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 199/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्याकडे देण्यात आला.
पोलीसांनी घडलेल्या चोरीचा प्रकार मोठा होता म्हणून याकडे अत्यंत कसोसीने लक्ष दिले. भरपूर प्रयत्न केल्यानंतर त्यांना प्राप्त झालेल्या माहितीला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि फय्युम कुरेशी यांची पत्नी अर्थात घराची मालकीनच चोर निघाली. पोलीसांनी शेरीना बेगम फहीम कुरेशी (25) रा.गवळीपुरा हिस याप्रकरणी अटक केली. चोरी गेलेला 100 टक्के ऐवज पोलीसांनी जप्त केलेला आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार शेख इमरान, रमेश सुर्यवंशी, शुभांगी कोरेगावे, गजानन किडे, विजय नंदे, संतोष बेल्लुरोड यांनी केलेल्या या कामासाठी त्यांचे कौतुक केले आहे. न्यायालयाने आज या चोर महिलेला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविलेले आहे.