नांदेड,(प्रतिनिधी)- माहितीच्या अधिकारात अर्ज आणि खंडणी मागितल्या प्रकरणी एका किडनी दान केलेल्या शिक्षिकेला दोन लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात सातवा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांच्या आवाहनाला मिळालेला हा प्रतिसाद आहे.
सौ.प्रेमालाबाई सिद्धाप्पा स्वामी (५३) यांनी देगलूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीप्रमाणे त्या जिल्हा परिषद हायस्कुल मुलांचे देगलूर येथे शिक्षिका आहेत.आकाश विठ्ठलराव देशमुख याने २५ जून २०२१ रोजी त्यांचे जंगम जातीचे प्रमाणपत्र खोटे आहे अशी तक्रार दिली.त्याबाबत चौकशी झाली तरीही आकाश देशमुख ५ जुलै २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता आणि २८ जुलै २०२१ रोजी दुपारी २ वाजता प्रेमलाबाई स्वामी यांना जिप शाळेत भेटला. तो प्रेमालाबाईला सांगत होता की मला ४ लाख रुपये द्या.नसता मी तुमची नोकरी घालवतो.तसेच मी एकाच्या मागे लागलो तर सोडत नाही असे सांगत होता.तेव्हा प्रेमलाबाईने त्यास मी फक्त १० हजार रुपये देऊ शकते.मी किडनी दान केलेली महिला आहे,माझी मुलगी आजारी आहे, एव्हडे पैसे म्हणजे मला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही असे सांगितले.तेव्हा आकाश देशमुखला महिलेवर दया आली आणि त्याने खंडणीची रक्कम अर्धी करून २ लाख देण्यास सांगितले. पोलिसांनी वर्तमानपत्रातून आवाहन केले म्हणून मी आज तक्रार देत आहे.या नुसार देगलूर पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३०६/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ५०६ नुसार दाखल केला आहे.या बाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे हे करीत आहेत.
माहिती अधिकार कायदयाच्या अंतर्गत माहिती मागणे आणि त्यासाठी खंडणी मागणे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.माहिती अधिकार कायद्याच्या सदउपयोगा ऐवजी दुरुपयोग वाढला आहे.प्रशासकीय अधिकारी सुद्धा आता दररोजचे आहे असे म्हणून त्यास पाठीशी घालत आहेत.पण पोलिसांनी आवाहन केल्या नंतर देगलूर पोलीस ठाण्यात हा सातवा गुन्हा दाखल झाला आहे.हा प्रकार जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आणि देशात सुद्धा बोकाळलेला आहे. वास्तव न्यूज लाईव्ह अश्या प्रकारे पीडित लोकांना आवाहन करीत आहेत की,माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून त्रास देणाऱ्या विरुद्ध आप आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्कीच तक्रारी द्या.