11 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय ध्वजसंहितेत थोडासा बदल करून शासनाने 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीदरम्यान ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भाचे आदेश शासनाच्या परिपत्रकाला अनुसरून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जारी केले आहेत. या आदेशाच्या प्रति एकूण 18 विविध विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यापार्श्र्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. तसेच स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक लोकांच्या आठवणीत राहावेत.स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेली स्पुल्लिंग कायम तेवत राहावेत आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकला पाहिजे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

भारतीय ध्वजसंहितेत थोडासा बदल करून राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या किंवा विनलेल्या लोकर, सुत, सिलक, खादी कपड्यापासून बनवलेला असावा या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून हाताने विनलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या कपड्यांचा राष्ट्रध्वज सुध्दा वापरता येईल. ही मोहिम राबवतांना राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी तयार करायला हवी. ऑनलाईन व ऑफलाईन राष्ट्रध्वज विक्री केंद्र उपलब्ध करावेत. राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही यासाठी जनजागृती करावी. प्रत्येक घरात झेंडा या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाची छायाचित्रे, चित्रफिती, ध्वनीमुद्रण इत्यादी साहित्य केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.

या शासन परिपत्रकावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.

हे शासन परिपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर सुध्दा प्रसिध्द करण्यात आले आहे. या शासन परिपत्रकात प्रत्येक घरावर फडकवलेला राष्ट्रध्वज 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान रात्रंदिवस कायम ठेवायचा आहे किंवा नेहमी प्रमाणे या दिवसात दररोज सुर्यास्ताअगोदर पुन्हा काढायचा आहे. याबद्दल काही एक उल्लेख केलेला नाही. बहुदा शासनाच्यावतीने या उपक्रमाची जनजागृती करण्यात येईल तेंव्हा त्यात अधिक सविस्तरपणे सांगितले जाईल. भारताच्या नागरीकांना आपल्या स्वातंत्र लढ्याची आठवण करून देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *