कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांस सानुग्रह सहाय्य योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व शासन निर्णयान्वये कोविड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याची ही योजना 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. कोविड या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुढील प्रमाणे राहील. दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

कोविड-19 या आजारामुळे 20 मार्च 2022 पूर्वी मृत्यू झालेला असल्यास 24 मार्च 2022 पासून 60 दिवसाच्या आत म्हणजेच 24 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. दिनांक 20 मार्च 2022 पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्युच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत अर्ज करावेत. या योजनेखाली अर्ज करण्यासाठी नमूद केलेल्या मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारण समिती (जीआरसी) मार्फत करता येतील. या योजनेसाठी ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करण्यात येईल असेही कळविले आहे.

सदर ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करुन अद्यापही ज्या अर्जदारांना 50 हजार सानुग्रह सहाय्य त्यांचे बँक खात्यात जमा झालेले नाही. अशा अर्जदारांनी 8 जुलै 2022 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे येऊन पैसे जमा झाले किंवा कसे याची खात्री करावी. पैसे जमा झाले नसल्यास किंवा ऑनलाईन अर्ज करताना बँक खाते नंबर चुकीचा टाकलेला असल्यास तो दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या नावाने आवक जावक विभागात अर्ज सादर करावा. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी. अर्जदाराचे बँक पासबुक व त्याची एक झेरॉक्स प्रत, अर्जदाराच्या बँक खात्याचे माहे जानेवारी २०२२  ते माहे जून २०२२ या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट , अर्जदाराने ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जाचा क्रमांक (अप्लीकेशन आयडी)इत्यादी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *