नांदेड (प्रतिनिधी)-भोकर रेल्वे स्थानकावर स्थानक अधिक्षकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा करणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाला भोकर येथील सत्र न्यायाधीश वाय.एम.एच.खराडी यांनी सहा महिन्याची साधी कैद आणि एक हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.
दि.14 मार्च 2020 रोजी सकाळी 8 वाजता भोकर रेल्वे स्थानकावर स्थानक अधिक्षक या पदावर श्रीनिवास हीे काम करत होते. त्या दिवशी तिकिट खिडकी जवळ गर्दी होती. त्यात शेट्टीवा बालाजी पिटलेवाड (19) रा.पोमनाळा ता.भोकर हा युवक आला आणि त्यांने श्रीनिवास यांचे कॉलर धरुन ओढले. त्यांना मारहाण केली त्यावेळी तेथे असलेले प्रवासी आणि रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी श्रीनिवासला शेटीबा पिटलेवाडच्या हल्यातून वाचविले. हा गुन्हा अगोदर पोलीस ठाणे भोकर येथे दाखल झाला आणि तपासासाठी रेल्वे पोलीसांकडे वर्ग करण्यात आला. त्या गुन्ह्याचा क्रमांक 376/2020 असा आहे. त्या गुन्ह्याचा तपास रेल्वेचे पोलीस उपनिरिक्षक येलगुलवार यांनी केला होता. शेट्टीबा बालाजी पिटलेवाडला अटक करून त्याच्याविरुध्द भोकर जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्यानुसार सत्र खटला क्रमांक 46/2021 सुरू झाला. या खटल्यात सरकार पक्षाने पाच साक्षीदारांना तपासले आणि त्यानुसार न्यायालयासक्षम आलेल्या पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपी शेट्टीबा बालाजी पिटलेवाडला दया दाखवत सहा महिने साधी कैद आणि एक हजार रुपये रोख दंड ठोठावला. दंडाचे पैसे भरल्यानंतर ही रक्कम तत्कालीन भोकर अधिक्षक श्रीनिवास यांना देण्याचे आदेश न्यायालयाने निकालपत्रात दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.संजय लाठकर यांनी मांडली आणि आरोपीचे वकील ऍड. आर.डी.खाडे हे होते. या प्रकरणाची पैरवी सध्याचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनात रेल्वे पोलीस अंमलदारांनी पुर्ण केली.