नांदेड,(प्रतिनिधी)- एक रिक्षा चालक महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला.मला काही नको नको म्हणत देवेंद्र फडणवीस शेवटच्या क्षणी उप मुख्यमंत्री झाले.हा राजकीय पटलांवरील गोट्यांचा खेळ आहे. आता एकनाथ शिंदेची जबाबदारी १८ व्या शतकातील राघोजी शिंदे आणि त्यांचे वारसदार महादजी शिंदे सारखी पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. सारीपाटाच्या खेळात फडणवीस आणि शिंदे असे म्हणावे की शिंदे आणि फडणवीस कोणतीतरी जोडी नक्कीच आज जिंकलेली आहे.असो पुढे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी आपली जबाबदारी नक्कीच पार पाडा आणि यशवंत व्हा अशी शुभकामना नक्कीच आहे.
सन २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणालाही बहुमत प्राप्त झाले नाही.तेव्हा फडणवीसांनी अगोदर अजित पवार यांना सोबत आणून सकाळी ५ वाजता शपथविधी पार पाडला. त्यानंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नवीन आघाडी तयार झाली.त्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना अशी कोणालाही न पटणारी युती तयार करून सत्ता स्थापन झाली.त्या सत्तेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.अजित पवार उपमुख्यमंत्री बनले.अजित पवार अगोदर सुद्धा उप मुख्यमंत्रीच होते.तीन पक्षांचे सरकार अडीच वर्ष चालले.त्यावेळेस तयार करण्यात आलेल्या एका सर्व समावेशक कार्यक्रमाप्रमाणे सत्ता चालत राहिली.हि सत्ता स्थापन करतांना उद्धव ठाकरे यांनी आपले पुत्र आदित्य ठाकरे यांना सुद्धा मंत्री केले.इथेच गडबड झाली.उद्धव ठाकरे यांना मिळालेला वारसा हा किंग मेकर असा होता.किंग बनण्याचा नव्हे.
त्या अगोदर राज ठाकरे वेगळे झाले.तेव्हा सुद्धा काही निवडकांच्या जोरावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दूर सारले. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष पद त्यांनाच देणे आवश्यक होते.पण घडले वेगळेच. नंतर राज ठाकरे यांनी आपला नवीन राजकीय पक्ष स्थापन केला.पण त्यात त्यांना काही मोठे यश आले नाही.त्यांचे पक्ष कार्यकर्ते वेगवेगळे सारीपाट मांडत राहिले आणि खेळ सुरूच होता.इकडे शिवसेनेला विक्री करणारी मंडळी शिवसेनेत आपली बाजू अत्यंत जोरदार पणे चालवत होती. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या मेहनतीने उभी राहिलेली शिवसेना ज्यात रंकाला राजा बनवण्याची ताकत घेऊनच चालत होती.
२०२० मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सत्तेत असतांना सर्वच राजकीय पक्षांना अनेक बंधने येतात अशीच बंधने उद्धव ठाकरे यांच्यावर आली. पण या अडीच वर्षात भाजपाने आपले वेग वेगळे डाव सुरूच ठेवले.त्यात सर्वप्रथम राज्यसभा आणि नंतर विधान परिषद निवडणुकांमध्ये काही आमदार फोडण्यात त्यांना यश आले.त्यानंतर सत्ता बदलाचा सर्वात मोठा डाव सुरु झाला.त्यात ठाण्यातील आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तयार झालेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीची सूत्रे स्वीकारली. ज्याच्याकडे गोट्या जास्त तोच श्रीमंत असा खेळ आपण सर्वानी खेळलेलाच आहे.तसेच जास्त आमदार एकनाथ शिंदे सोबत तर तेच श्रीमंत ठरले.त्यासाठी अगोदर सुरत – गौहाटी- गोवा – मुंबई असा वर्ग एकच प्रवास करत मुख्यमंत्री पदाला गवसणी घातलीच. सत्ता स्थापन करतांना मला काही नको म्हणणारे फडणवीस ऐनवेळी उपमुख्यमंत्री झाले. असा नवीन सारीपाट मांडला गेला आहे. हा सारीपाट मांडण्यात कोणी किती गोट्या कोठून आणल्या आणि त्याचा उपयोग कसा कसा केला हे लिहिण्याची आता गरज राहिलेली नाही. दहा दिवसातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले त्या बाबत सुद्धा आम्हाला काही एक म्हणायचे नाही.
एकनाथ शिंदे यांनी आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत असे सांगत दहा दिवसांचा खेळ चालवला होता.शपथ ग्रहण करतांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव घेऊनच शपथेची सुरुवात केली.रिक्षा चालक ते राज्याचे मुख्यमंत्री अशी मजल मारतांना या मागील सर्वच राजकारण एकनाथ शिंदे यांनी समजून घेतले असेलच. आता एकनाथ शिंदे यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्याचा सन्मान सुद्धा मिळणार आहे.त्यावेळी ग्वालियर राज्यातील शिंदे राजवटीला आठवण करून राघोजी शिंदे आणि महादजी शिंदे यांच्या सारखे नाही तरी त्यांच्या मार्गावर चालण्याची ताकत पांडुरंगाकडे जरूर मागा. पुन्हा अडीच वर्षात निवडणुका येणारच आहेत.त्यावेळी जनतेसमोर जावे लागेल.तेव्हा उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे यांना वगळून फक्त बाळासाहेबांचे नाव चालेल काय? याचा शोध जरूर लावा.