नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षा झाल्यानंतर उमरी न्यायालयातून तीन आरोपींना बाहेर नेत असतांना पोलीसांना झटका देवून तीन आरोपी पळून गेले. या आरोपींच्या शोधासाठी पोलीस विभाग भरपूर मेहनत घेत आहे. काल रात्री या संदर्भाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन 2012 मध्ये कोल्हा ता.उमरी येथे झालेल्या एका मारामारी प्रकरणात उमरीचे न्यायाधीश ए.बी.रेडेकर यांनी दि.1 जुलै रोजी दुपारी कोल्हा गावातील अविनाश निवृत्ती क्षिरसागर, प्रकाश रमेश क्षीरसागर आणि रमेश माणिका क्षीरसागर या तिघांना दोषी माणून त्यांना तीन वर्ष शिक्षा आणि प्रत्येकास 35 हजार रुपये रोख दंड असा एकूण 1 लाख 5 हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरल्यानंतर तीन वर्षाची शिक्षा अपील अवधीसाठी स्थगित केली जात असते. आम्ही 1 लाख 5 हजार रुपये भरतो असे तिन्ही आरोपींनी सांगितले. त्यानंतर पोलीस अंमलदार हनमंत सुगावे यांना या तिघांचा ताबा देण्यात आला. पण न्यायदान कक्षाच्या बाहेर आल्यावर हे तिघे पोलीस अंमलदार हणमंत सुगावेला झटका देवून पळून गेले. पोलीसांनी आणि तेथे असणाऱ्या लोकांनी या आरोपींचा पाठलाग केला. पण ते सापडले नाहीत. त्यानंतर काल दि.3 जुलै रोजी रात्री कायदेशीर अभिरक्षेतून पळून गेलेल्या अविनाश क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर आणि रमेश क्षीरसागर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक मोहन भोसले हे करीत आहेत. या संदर्भाने मोहन भोसले यांच्याकडे विचारणा केली असता मी व माझे पोलीस अंमलदार मागील तीन दिवसांपासून सतत मेहनत घेत आहोत आणि लवकरच या पळून गेलेल्या आरोपींना आम्ही पुन्हा पकडून आणून असा विश्र्वास व्यक्त केला.
तीन वर्ष शिक्षा आणि 1 लाख 5 हजार रुपये दंड; अन आरोपी न्यायालयातून फरार