नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आता वाळूचे नियंत्रण आजारी रजेवर असलेल्या एका पोलीस अंमलदाराकडे देण्यात आला असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडताच आज कारभारी झालेला पोलीस अंमलदार आजारी रजेवर निघून गेला होता. पण आता तो सन्माननिय श्री.घोरबांड साहेबांसोबत पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुध्दा कैद आहे.
दि.6 जून रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शिवाजी गंगाधर पाटील(35) बकल नंबर 2929 यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारल्याची कार्यवाही केली. 7 जून ते 10 जून अशी पोलीस कोठडी त्यांना प्राप्त झाली होती आणि त्यानंतर कांही दिवस तुरूंगात वास्तव्य केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.हा प्रकार घडला त्या दिवशी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील चार अक्षरी अडनावाचे एक पोलीस अंमलदार आजारी रजेवर गेले होते. त्यानंतर नांदेड ग्रामीणचे मागील दीड वर्षापासून तोंडी आदेशावर कार्यरत पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण जिल्ह्याची जबाबदारी त्यांनी जास्त दिवस सांभाळली नाही आणि जुलै महिन्याच्या सुरूवातीला ते परत आपल्या खुर्चीवर आसीन झाले. याच दिवशी आजारी रजेवर गेलेला चार अक्षरी अडनावाचा पोलीस अंमलदार प्रभाकरा (सुर्य) च्या उजेडात अशोकराव घोरबांड साहेबांनाकडे परत आले प्राप्त माहितीनुसार आजही ते कायदेशीररित्या आजारी रजेवरून परत आलेले नाहीत. पण त्यांच्याकडे शिवाजी पाटील यांच्याकडे असलेल्या सर्व कारभार देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवाजी पाटील यांच्यानंतर हेच पोलीस अंमलदार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा सर्व कारभार चालवतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आता आजारी रजेवरच्या पोलीस अंमलदाराकडे वाळूचा कारभार ?