नांदेड(प्रतिनिधी)-15 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या गुन्ह्यातील एकाला आर्थिक गुन्हा शाखेने अटक केल्यानंतर आज दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.पी.एस.जाधव यांनी दोन दिवस अर्थात 7 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दत्तनगर भागात राहणारे 62 वर्षीय व्यक्ती सुदाम किशन राऊत यांनी दि.28 जून रोजी दिलेल्या तक्रारीनुसार 26 जून 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास दत्तनगर भागात अक्षय भानुसिंह राऊत, राजू बिल्डर, अशोक उमरेकर, गुड्डू आणि इतर चार ते पाच लोक आले आणि त्यांनी 8 नोव्हेंबर 2021 रोजी कायदेशीर खरेदी केलेल्या दोन दुकानाच्या ताब्याबद्दल वाद उपस्थित केला. त्यातील राजू बिल्डरकडे एक मुद्रांक कागद होता. त्यावर तारीख 13 मार्च 2013 अशी होती. यानंतर या विषयावर चर्चा झाली. तेंव्हा सुदाम राऊत यांना सांगण्यात आले की, बिट्टू बाटीयाने या लोकांना शटर रिकामे करण्यासाठी 15 लाख रुपये देण्याचे सांगितले आहे. जोपर्यंत 15 लाख मिळणार नाहीत. तोपर्यंत शटरला हात लावू देणार नाही. या बाबतची चर्चा एकदा अक्षय रावत यांच्या माता गुजरीजी कॉम्प्लेक्स हिंगोली गेट येथील कार्यालयात सुध्दा झाली होती. त्यानंतर 26 जून रोजी सायंकाळी 5 वाजता अक्षय रावत, अशोक उमरेकर, राजू बिल्डर, गुड्डू व इतर चार ते पाच लोक आले आणि त्यांनी वादग्रस्त दोन शटरला माझे लावलेले कुलूप तोडून दुसरे लॉक लावले. त्यानंतर हे सर्व जण चार ते पाच तास त्या शटरसमोर बसून राहिले आणि नंतर निघून गेले. या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 246/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 386, 143, 147, 447, 506 आणि 511 नुसार दाखल केला. सुरूवातीला या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्याकडे होता. पुढे या गुन्ह्याचा तपास नांदेड जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाला.आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक हनमंत मिटके यांच्याकडे देण्यात आला. आज दि.5 जुलै रोजी हनमंत मिटके आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी अक्षय भानुसिंग रावतला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.मोहम्मद रजियोद्दीन यांनी या प्रकरणातील आरोपींकडून बोगस बनवलेली सौदाचिठ्ठी जप्त करणे आहे. कोणत्या आरोपीची काय भुमिका या गुन्ह्यात आहे याची तपासणी करणे आहे. तसेच हा गुन्हा भुमाफियासंबंधीत आहे. त्यामुळे अशा सौदाचिठ्ठ्याकरणे आणि जागीचा ताबा मिळवणे याबाबतची सविस्तर माहिती आरोपीकडून घेणे आहे. त्यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी अक्षय रावतला द्यावी अशी विनंती केली. न्यायाधीश सौ.पी.एस.जाधव यांनी अक्षय भानुसिंग रावतला दोन दिवस अर्थात 7 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. इतर आरोपींचा आर्थिक गुन्हे शाखा शोध घेत आहे.