बेघर पत्रकारांच्या सोसायटीत आता उपलब्ध पंचतारांकित सुविधा

नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांवर दया दाखवत महानगरपालिकेने नांदेडच्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीची दोन एकर जागा बेघर पत्रकारांना आपल्यासाठी तुटपुंजा का होईना निवारा बनविण्यासाठी दिली. या बेघर पत्रकारांनी आता तेथे पंचतांराकित सुविधा तयार केल्या आहेत. हे बेघर होते काय ? मनपाने नांदेडच्या नागरीकांची जागा का त्यांना फुकटात दिली? हे सर्वच ठिक आहे तर महानगरपालिका या बेघर पत्रकारांवर कार्यवाही का करत नाही हा मोठा प्रश्न जनतेत आहे.
अनेक वर्षापुर्वी बेघर पत्रकार आहोत आम्हाला राहायला जागा नाही असे अर्ज करून काही बोरुबहाद्दरांनी महानगरपालिकेची दोन एकर जागा मिळवली. खरे तर ही जागा नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकांच्या मालकीची आहे. फुकटात आदंण मिळालेल्या या दोन एकर जागेवर बेघर पत्रकारांनी 36 भुखंड बनवले. त्यात महाराष्ट्रात गाजलेल्या सर्वात गरीब पत्रकाराला सर्वात मोठा भुखंड दिला. त्यानुसार त्यांच्या सेवकांना त्यांच्या-त्यांच्या सेवेप्रमाणे मोबदल्यात हे फुकटाचे भुखंड मिळाले आणि सुरू झाला भुखंडांचा धंदा.
पत्रकार बेघर जरुर होते पण बिनडोक नक्कीच नव्हते. अनेक महिलांना पत्रकार बनवले आणि नंतर त्यांना भुखंड विक्री केले. फुकटाच्या भुखंडांची किंमत या बेघर पत्रकारांनी 80 लाख ते दीड करोड लाटल्याचे लोक सांगतात. कायदेशीर दृष्टीकोणातून त्या जागेची जी किंमत आहे. ती दाखविण्यात आली आणि आपल्याला आता खायला नाही या सदरात मुद्रांकामध्ये नोंद करून फुकटता मिळालेले भुखंड चढ्या भावात अशांना विक्री केले. ज्यांना पत्रकारीतेतली गंध कधीच माहित नव्हती. पण शासकीय दृष्टीकोणातून मी अमका पत्रकार आहे हा कागद जोडला की, सर्व कांही संपले. भारताच्या प्रक्रियेमधला हा विचित्र दुवा आहे.
या पत्रकारांमध्ये आता तेथे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सौभाग्यवतीच्या नावे खरेदी केलेल्या भुखंडावर टोलेजंग इमारत उभी करणे सुरू आहे. याबाबत वाद आता न्यायालयात पोहचला आहे. पण महानगरपालिका मात्र मुग गिळून गप्पच बसली आहे. बहुदा आ.कॉंगे्रस पक्षाचे आहेत आणि महानगरपालिकेत कॉंगे्रसचे बहुमत आहे म्हणून असे घडले असेल. बेघर पत्रकारांसाठी दिलेले भुखंड अशा पध्दतीने विक्री होत गेले.
या भुखंडांमध्ये एका भुखंडावर प्रसिध्द मद्य विक्रेता सुरेश राठोड यांचे घर पण आहे. ते घर सुध्दा त्यांच्या सौभाग्यवतींच्या नावे आहे. वास्तव न्युज लाईव्हने बेघर पत्रकारांच्या भुखंडांचे पोस्टमार्टम करण्यास सुरूवात करण्याच्या काही दिवस अगोदर आपल्या शेजारी असलेला दुसरा भुखंड सुध्दा सुरेश राठोड यांनी सुरू केला. पोस्टमार्टम सुरू होताच सुरेश राठोड यांनी नवीन घेतलेल्या भुखंडावर अत्यंत जलदगतीने सुरक्षा भिंत बांधली. त्या त्यांनी जलतरणीका तयार केली. महानगरपालिकेने बेघर पत्रकारांच्या सोसायटीला नोटीस दिली आहे पण त्यात प्रगती काहीच झाली नाही आणि म्हणून ती नांदेडच्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीची ही जागा आता बेघर पत्रकारांनी बेघर पत्रकारांनाच अतिउच्च रक्कमेत विक्री केली आहे.
जलतरणीका तयार होत असतांना त्याची कांही नियमावली आहे. त्याबद्दल महानगरपालिकेतून परवानगी घेण्यात आली काय याची विचारणा केली असता याबद्दल आम्हाला काही माहिती नाही अशा पध्दतीने मनपातील मंडळी बोलत आहेत आणि कानावर हात ठेवत आहेत. पण असे का करत असतील याचा शोध घेतला असता बदललेले सरकार त्यास जबाबदार असू शकते असे वाटायला लागले. महानगरपालिकेत सत्ता जरी कॉंग्रेसची असली तरी राज्यपातळीवर बदलेले सरकार आता या बेघर पत्रकारांच्या भुखंड विक्री धंद्याला पाठीशी घालील अशी चर्चा सुध्दा सुरू झाली आहे.
ज्या बेघर पत्रकारांना राहायला घर नाही अशा लोकांना महानगरपालिकेने फुकटात दिलेल्या जागेवर आता तेथे असलेल्या मोठ-मोठ्या पत्रकारांनी त्या जागी पंचतारांकीत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे या बेघर पत्रकारांच्या बाबतीत सुध्दा काय पत्रकार, काय फुकटाची जागा, काय भुखंड धंदा, काय पंचतारांकित सुविधा सर्व कांही ओकेच झाले असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *