खून केलेले तीन आरोपी देगलूर पोलीसांनी काही तासातच पकडले ; पाच दिवस पोलीस कोठडी 

नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या मारेकऱ्यांना देगलूर पोलीसांनी काही तासातच गजाआड केले. देगलूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने यांनी 3 मारेकऱ्यांना 13 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
                   उमाकांत हेमंतराव पाटील यांनी पोलीस ठाणे देगलूर येथे तक्रार दिली की, त्यांचे वडील हेमंतराव आणि गावातील विठ्ठल पाटील यांचे वडील अंबादास हे मित्र होते. अंबादास यांची पत्नी शोभाबाई यांचा मृत्यू 20 ते 22 वर्षापुर्वीच झाला. त्यानंतर अंबादास हे दारुच्या आहारी गेले आणि त्यांचा पण मृत्यू 8 ते 10 वर्षापुर्वी झाला. यानंतर अंबादासचा मृत्यू माझ्या वडीलांमुळे झाला. असा राग अंबादासच्या नातलगांना होता.
               5 जून रोजी सकाळी 7 ते 7.30 यावेळेदरम्यान हेमंतराव रामराव पाटील (50) हे खत आणि बियाणे आणण्यासाठी भूतनहिप्परगा येथून देगलूरला गेले. तेथे विठ्ठल अंबादास पाटील (28), जीवनराव यादवराव पाटील (70) आणि नवनाथ जीवनाराव पाटील (55) या तिघांनी मिळून त्यांना भायेगाव रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ लाथाबुक्कांनी मारहाण केली. त्यानंतर हेमंतराव पाटील यांना पोटात त्रास होवून उलटया झाल्या. सुरूवातीचा उपचार हणेगाव ता.देगलूर येथील प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानुसार हेमंतराव पाटील यांच्या पोटातील आतडे तुटून रक्तस्त्राव झाला आणि त्याच्या इंफेक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आला. याप्रसंगी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 329/2022 भारतीय दंड संंहितेच्या कलम 302, 294 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
                     पोलीसांना मारेकऱ्यांची नावे माहित होती. त्यामुळे त्यांनी हुतनहिप्परगा गावातून एक आरोपी पकडला आणि इतर दोन मुसळधार पावसाचा आधार घेवून फरार होण्याच्या मार्गावर असतांना देगलूर पोलीसांनी सायबर टिमची मदत घेत आपले कौशल्य वापरून त्यांना पकडले. आज दि.8 जुलै रोजी पकडलेले तीन आरोपी विठ्ठल अंबदास पाटील, जीवनराव यादवराव पाटील आणि नवनाथ जीवनराव पाटील या तिघांना देगलूर न्यायालयात हजर केले. पोलीसांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश अमितसिंह मोहने यांनी तिघांना पाच दिवस अर्थात 13 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
                     खूनाचा गुन्हा दाखल झाल्यावर अत्यंत वेगवान गतीने आरोपींना पकडून गजाआड करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी कौतुक केले आहे. ही विद्युतगतीची कार्यवाही करणाऱ्या पोलीसांमध्ये देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक परगेवार, पोलीस उपनिरिक्षक मोरे, पोलीस अंमलदार तलवारे, गायकवाड, मलदोडे, शिंदे आणि मोरे यांनी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *