तामसा पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 26 जणांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि 5 लाख 46 हजार रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2018 च्या भिमाकोरेगाव घटनेनंतर हदगाव तालुक्यातील आष्टी गावात एका बालकाचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर तामसा पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या जमावातील 26 जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.इ.बांगर  यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि विविध कलमानुसार प्रत्येकी 21 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची एकूण रक्कम 5 लाख 46 हजार रुपये होत आहे. त्यांना सुध्दा शिक्षा देण्यात आली आहे.
सन 2018 मध्ये भीमाकोरेगाव येथे घडलेल्या प्रकारानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. ते पडसाद नांदेड जिल्ह्यातही आले. त्यावेळी आष्टी ता.हदगाव या गावात एका बालकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या संदर्भाचे निवेदन देण्यासाठी काही मंडळी पोलीस ठाणे तामसा येथे गेली. त्यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा हे होते. तामसा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.बी.गोमारे हे होते. निवेदन देण्यासाठी आलेल्या मंडळीला भिम टायगर सेनेचे अमोल रावळे यांनी उचकुन लावले. त्यावेळी तयार झालेल्या जमावाने पोलीसांविरुध्द घोषणा बाजी केली आणि पोलीस ठाणे तामसावर जबरदस्त दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक पोलीसांना किरकोळ मार लागला. पोलीस ठाण्याचे नुकसान झाले. तसेच एम.एच.26 आर.435 या गाडीची जमावाने तोडफोड केली. अशी सविस्तर तक्रार तामसा येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक रावसाहेब दिगंबर पवार यांनी दिली. त्यावेळी असंख्य लोकांची नावे त्या तक्रारीत लिहिलेली होती. तामसा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 2/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 148, 143 सोबत सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदानुसार गुन्हा दाखल केला.
सुरूवातीला पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.बी.गोमोर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पुढे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल माने यांनी उर्वरीत तपास करून न्यायालयात 27 जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. अमोल उत्तमराव रावळे (27), जयकिशन शेषराव रावळे(27), तानाजी उर्फ रवि विठ्ठलराव अचलखांबे (22), रवि गणपत वाघमारे (26), संदीप केरबा हनवते (24), आष्टदिप केरबा हनवते(22), धम्मविर पांडूरंग हनवते(23), नितीन मुकींदाराव जाधव(23), संदीप यशवंतराव जाधव (30), दिपक कोेंडीबा जाधव(25), नितीन चांदराव खंदारे (22), देवानंद यशवंत जाधव (22) सर्व रा.तामसा ता.हदगाव, सुरेश गौतम शेळके (19), रविंद्र शामराव शेळके(26), विनोद प्रभु शेळके(27) रा.कंजारा ता.हदगाव, मारोती नामदेव तुपसाखरे (36), राजू जयवंता नारळे(27), मधुकर बालाजी नारळे (32), अनिल शंकर वाघमारे (23) रा.दिग्रस ता.हदगाव, कचरु तुकाराम वाठोरे (40) रा.लोहा ता.हदगाव, अक्षयकुमार प्रकाश नारळे (24) रा.आंबेडकरनगर नांदेड, पांडूरंग गोविंद नरवाडे (38) रा.लोहापाटी ता.हदगाव, संघपाल प्रभाकर कांबळे (26), प्रमोद बाबूराव वाठोरे (26) रा.वडगाव खु ता.हदगाव, मिलिंद विजय कांबळे(26) रा.वडगाव (बु) ता.हदगाव, रमेश पुरभा कदम(40), धम्मपाल मारोतराव कदम (35) रा.शिवपुरी ता.हदगाव.
न्यायालयात हा खटला सत्र खटला क्रमांक 243/2019 नुसार चालला. या खटल्यात सहा साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी 26 आरोपींना पोलीस ठाणे तामसावर हल्ला करण्यासाठी दोषी मानले.  न्यायालयाने या आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 353 आणि 332 साठी 5 वर्ष सक्तमजुरी आणि 14 हजार रुपये रोख दंड, कलम 427 साठी एक हजार रुपये रोख दंड, कलम 114 साठी 6 महिने सक्तमजुरी 1 हजार रुपये दंड,कलम 143 साठी सहा महिने सक्तमजुरी एक हजार रुपये दंड, 147 साठी सहा महिने सक्तमजुरी एक हजार रुपये दंड,  कलम 148 साठी एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड, सार्वजनिक मालमत्ता विद्रोपीकरण कायद्यानुसार सहा महिने सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची एकूण रक्कम 5 लाख 46 हजार रुपये होत आहे.या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रित भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली.  या खटल्यात तामसाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अशोक उजगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार प्रदीप कंधारे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *