नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांवर कटाक्ष करणे, टिका करणे सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत सहज आहे. कारण ते काम करतात. त्यावेळी काही चुकाही होतात आणि त्या चुकाच लक्षात राहतात. त्यांच्या चांगल्या कामांची दखल सुध्दा घेतली पाहिजे नाही तर आम्ही आमच्या लेखणीसोबत अन्याय करू. असाच एक प्रकार राहेर येथे आज सकाळी घडला. दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीच्या पाण्याजवळ जवळ राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेची दखल राहेर दुरक्षेत्राच्या पोलीस अंमलदाराने घेतली. तेंव्हा धक्कादायक प्रकार असाच समोर आला की, त्या 70 वर्षीय महिला आपला जीव देण्यासाठी नदीकडे जात होत्या.
गेली तीन दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या, नाले, दुथडी भरून वाहत होते. यामुळे पोलीसांना सुध्दा आपल्या दररोजच्या कामासह पाण्याची वाढ लक्षात ठेवून काम करावे लागत होते. काल रात्रीपण पाऊस जोरदारच होता. आजच्या सुर्योदयासोबत तो थांबला आहे. पण दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि नाले दुपारपर्यंततरी पुर्णपणे थंडावले नव्हते.
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहेर गावाजवळून गोदावरी नदी वाहते. पोलीसांचे दुरक्षेत्र कार्यालय राहेरमध्ये आहे आणि त्या राहेर गावातील गोदावरी नदीच्या पात्राजवळ पोलीस अंमलदार शेख शब्बीर लक्ष ठेवून होते. त्यावेळी एक अत्यंत वयस्कर महिला हळूहळू गोदावरी नदीपात्राच्या जवळ जवळ जात असल्याचे चित्र शेख शबीर यांना दिसले. त्यांनी सध्याच्या पाण्याची परिस्थिती पाहता त्या महिलेची विचारपुस केली. पण ती महिला सांगत होती त्या शब्दांवर शेख शब्बीरचा विश्र्वास बसत नव्हता. म्हणून महिला आपल्याला कांही तरी दुसरेच सांगते आहे आणि तिच्या मनात काही तरी आहे ही बाब शेख शब्बीरला वाटत होती. या परिस्थितीत त्यांनी शब्दांच्या पलीकडे असणारा अर्थ महिलेच्या बोलण्यातून समजून घेतला आणि कांही गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना चांगल्या जागी बसवले आणि त्यांची सविस्तर विचारणा केली तेंव्हा मोठा धक्कादायक प्रकार समोर आला.
या महिला रतनबाई गोविंद यंजेपवाड (70) रा.पाळा ता.मुखेड आहेत. ही बाब शेख शब्बीरला कळली. पुढे विचारणा केली असता एक मुलगा होता. दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला. एक मुलगी आहे तिचे लग्न झालेले आहे. सुनबाई लक्ष्मीबाई यंजेपवाड यांनी रतनबाईच्या नावाची शेती कांही तरी खोटे सांगून आपल्या नावाने करून घेतली आणि तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केले. ही बाब रतनबाईने ओळखली तरीपण ज्या प्रमाणे काट्यात राहुन सुध्दा गुलाब जगाला सुगंध देतो. त्याप्रमाणे रतनबाई आपले जीवन सुध्दा व्यतित करत होत्या. काही दिवस मुलीकडे गेल्या. पण शेवटी मुलीच्या घरी जास्त दिवस राहणे त्यांना आवडले नाही आणि काल रात्री त्या राहेरला पोहचल्या. मंदिरात राहिल्या आणि आजचा सुर्योदय होताच मंदिराशेजारुन वाहणाऱ्या गोदावरीच्या गर्भात आपण विसावा घ्यावा असा विचार करून त्या दुथडी वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्राजवळ जात असतांना शेख शब्बीरच्या नसीबात हे काम होते. विचारवंत म्हणतो संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे आणि शेख शब्बीरने ते निमंत्रण स्विकारले म्हणूनच रतनबाई सुखरुप राहिल्या.
घडलेला प्रकार शेख शब्बीरने आपले प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव पुरी यांना सांगितला. रतनबाईला पोलीस ठाणे कुंटूर येथे आणण्यात आले महादेव पुरी यांनी त्यांच्या सूनबाई लक्ष्मीबाई यंजेपवाडला बोलावून घेतले आणि त्यानंतर त्यांना सांगितले माणसाचे आश्रु सांगतात की तुम्हाला दु:ख किती आहे, संस्कार सांगतात तुमचे कुटूंब कसे आहे आणि वेळ सांगते की नाते कसे आहेत. या शब्दातून महादेव पुरींनी दिलेले औषध लक्ष्मीबाईने स्विकारले आणि आपल्या सासु रतनबाईला घेवून आपल्या घरी रवाना झाल्या.पोलीसांनी आज घेतलेली ही मेहनत लहान-लहान गोष्टींमधून कसा आनंद मिळतो हे दाखवते. इच्छा तर राजांच्या सुध्दा पुर्ण झाल्या नाहीत. पण गरजा भिकाऱ्यांच्या सुध्दा पुर्ण होतात. पोलीसांनी घेतलेल्या या मेहनतीसाठी त्यांची प्रशंसाच करायला हवी.
गोदावरीच्या गर्भात विसावण्यासाठी निघालेल्या 70 वर्षीय महिलेला पोलीस अंमलदार शेख शब्बीरने वाचवले