नांदेड(प्रतिनिधी)-बनावट गायछाप तंबाखू विक्री करणाऱ्या दोन जणांना इतवारा पोलीसांनी पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या तक्रारीमध्ये तीन जणांची नावे आरोपी या सदरात आहेत.
विलास रामेश्र्वर सोमानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 14 जुलै रोजी दुपारी अन्सारी ट्रेडर्स बर्की चौक इतवारा या दुकानात तपासणी केली असता त्या दुकानात दामोधर जगन्नाथ मालपाणी अहमदनगर यांच्यावतीने तयार होणाऱ्या गाय छाप तंबाखूला बनावट प्रकारचे लेबल आणि रॅपर वापरून बनावट प्रिंटींग केली आणि त्यात तंबाखू बनवुन ती गायछाप तंबाखू आहे म्हणून विक्री करत होते. यामुळे मुळ कंपनीची फसवणूक झाली आहे. तसेच शासनाला मिळणारा महसुल बुडाला आहे. या तक्रारीमध्ये फैजान अन्सारी फारुख अन्सारी (19), मोहम्मद अन्सार मोहम्मद निसार (37) आणि वासे अशा तिन जणांची नावे आरोपी या सदरात लिहिलेली आहेत. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 178/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471, 482, 483, 486, 487, 34 आणि प्रतिलिपी अधिनियम 1957 च्या कलम 51 आणि 63 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड यांच्याकडे देण्यात आला.
रमेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दि.15 जुलै रोजी पकडलेल्या फैजान अन्सारी फारुख अन्सारी (19), मोहम्मद अन्सार मोहम्मद निसार (37)दोघांना न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने पोलीसांची विनंती एक दिवसांसासाठी मान्य केली आहे.
बोगस गायछाप विक्री करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी