वरिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवायचा आहे. यानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अमृत महोत्सव’ समितीच्या बैठकीचे आयोजन विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये दि.२० जुलै रोजी करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. ११ ते १७ ऑगष्ट दरम्यान महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वजाची उभारणी करावयाची आहे. ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील (नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली) या चारही जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केलेले आहे. तरी ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले आहे.