
नांदेड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या संकल्पनेतून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी प्रशासन पुर्णपणे सज्ज आहे. जनतेच्या सुविधेसाठी शासनाने ध्वज संहितेत सुधारणा केली आहे. प्रत्येक कुटूंबाला तिरंगा उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अनेक दाते मदत करणार आहेत. तेंव्हा जनतेने दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सुर्योदयानंतर आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि सायंकाळी सुर्यास्ताच्या अगोदर तो पुन्हा उतरवून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, कोरोना प्रतिबंधक लस आणि महावितरणच्यावतीने होणारे कार्यक्रम याबद्दलची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्स डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता ए.व्ही.राख, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 35 लाखांच्या आसपास आहे. त्यांचे विभाजन कुटूंबात केले तर ते 7 ते 7.5 लाख कुटूंबात होते. त्यातील मनपा क्षेत्रात दीड लाख कुटूंब आहे. प्रत्येक कुटूंबाच्या घरावर दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान दररोज तिरंगा फडकला पाहिजे यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. यामध्ये सर्वात मोठी गरज तिरंगे उपलब्ध करण्याची आहे. त्यासाठी सुध्दा अनेक जागी बोलणे झाले आहे. तिरंगे भरपूर संख्येत उपलब्ध होती. नागरीकांनी स्वत: आपला तिरंगा ध्वज खरेदी करून तो आपल्या घरावर फडकवायचा आहे. 13 ते 15 ऑगस्ट या तिन दिवसांत सुर्योदयानंतर ते सुर्यास्ताच्या अगोदरपर्यंत तिरंगे नागरीकांनी आपल्या घरावर फडकवावेत आणि सायंकाळी न विसरता ते काढून घ्यावेत. यात काही अडचणी येणार असतील तर त्याचे नियोजन करून आपल्या घरावर फडकवलेला तिरंगा सुर्यास्तासोबत काढला जाईल याची दक्षता घ्यावी. तिरंगा कसा फडकवावा याबद्दलचे एक साध्या भाषेतील आणि सर्वसामान्य माणसाला समजेल अशा प्रकारचे एक सादरीकरण आम्ही तयार करत आहोत. ते सुध्दा जनतेला उपलब्ध करून देणार आहोत. जिल्ह्यात 50 हजार अधिकारी आणि कर्मचारी आहेत. हे सर्व मिळून दोन ते तीन लाख तिरंगे उपलब्ध होतील याची सोय करणार आहेत. नांदेडसाठी harghartirangananded.in नावाचे एक संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यावर नोंदणी करून या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा आपण सहभागी झाल्याचे नमुद करायचे आहे. सोबतच तिरंगा उत्पादक, विक्रेते यांनी सुध्दा या संकेतस्थळावर आपली नोंदणी करायची आहे. जेणे करून तिरंग्यांची उपलब्धता जास्त होईल असे डॉ.विपीन म्हणाले. तिरंगे खादी, कॉटन, सिल्क आणि पॉलीस्टर या कपड्यांमध्ये सुध्दा फडकवता येतील असे डॉ.विपीन यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या -निळकंठ भोसीकर

या पत्रकार परिषदेत उपस्थित जिल्हा शल्य चिकित्स डॉ.निळकंठ भोसीकर यांनी सांगितले की, 15 जुलै पासून पुढील 75 दिवसांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेदरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लस 18 पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिली जाणार आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस (बुस्टर डोस) आठवणीने घ्यावी. जेणे करून या पुढे कोरोनाने पुन्हा हल्ला केला तरी बाधीत व्यक्तीला ऑक्सिजनची गरज लागणार नाही. अतिदक्षता विभागात जास्त लोकांना उपचार घ्यावा लागणार नाही. परिणामी मृत्यू दर कमी होईल. आजपर्यंत पहिल्या डोसचे 81 टक्के व्यक्तींनी उपयोग घेतले आहेत. तसेच दुसऱ्या डोसचे 65 टक्के लोकांनी उपयोग घेतले आहे. या टक्केवारीमध्ये असलेली 100 टक्केची कमतरता ही इतर ठिकाणी डोस घेतल्यामुळे दिसते असल्याचे डॉ.निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट केले.
शहरातील नागरीकांनी तिरंगा फडकवावा-मनपा आयुक्त सुनिल लहाने
या पत्रकार परिषदेत मनपा आयुक्त सुनिल लहाने यांनी सांगितले. नांदेड मनपा क्षेत्रात 1.25 ते 1.50 कुटूंब आहे. जास्तीत जास्त लोकांना तिरंगा ध्वज कसा पुरविता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक घटकाच्या माध्यमातून प्रत्येक कुटूंबापर्यंत तिरंगा पोहचविता येईल यासाठी नियोजन केले आहे. शहरातील प्रत्येक कुटूंबाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर दररोज तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन केले आहे.
पोलीस सुध्दा सहभागी-पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे
जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे तहसीलदारांच्या दररोज संपर्कात आहेत आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमात आपला काय सहभाग देता येईल याबद्दल प्रयत्न करत आहेत. पोलीस विभागाच्यावतीने सुध्दा जास्तीत जास्त तिरंगे ध्वज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नागरीकांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात सहभागी होवून आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन केले.
महावितरणचे अनेक कार्यक्रम -कार्यकारी अभियंता ए.व्ही. राख
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान उज्वल भारत उज्वल भविष्य या योजनेदरम्यान महावितरणच्यावतीने जांब ता.मुखेड आणि कहाळा ता.नायगाव येथे दोन नवीन उपकेंद्र कार्यान्वीत होणार आहेत. 7 हजार पेक्षा जास्त लोकांना मोफत विज जोडणी देण्यात आली आहे. दिनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत मनपा क्षेत्रात सुध्दा चार नवीन उपकेंद्रे तयार केली जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान सुध्दा अनेक गरजवंतांना आणि लाभार्थ्यांना मोफत विज जोडणी दिली जाणार आहे.