नांदेड(प्रतिनिधी)- शासकीय पातळीवरच्या अधिकारी म्हणून असणाऱ्या विविध जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडतांना सामाजिक उत्तरदायीत्वाची भूमिका ही प्रत्येक अधिकाऱ्यांना अचूक पार पाडावी लागते. आपली कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राजपत्रीत अधिकारी महासंघातील सहभाग हा अत्यंत गरजेचा असून एक नवे बळ आपल्याला घेता येते. घेतलेल्या निर्णयाची, वरिष्ठांकडून आलेल्या आदेशांची आत्मविश्वास पूर्वक अंमलबजावणी करतांना आपली संघटना खंबीर उभे राहण्याचेही बळ देते, असे प्रतिपादन राजपत्रीत अधिकारी महासंघाच्या नांदेड जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघ, नांदेडच्या जिल्हा समन्वय समितीची आज सर्वसाधारण सभा संपन्न झाली. जिल्हा प्रशिक्षण संघाच्या हॉलमध्ये झालेल्या या बैठकीस कार्याध्यक्ष संजय तुबाकले, सचिव डॉ. राजेंद्र पवार, कोषाध्यक्ष शिवप्रसाद चन्ना, उपाध्यक्ष आर. बी. चलवदे, अविनाश राऊत, डॉ. अजय मुस्तरे, मुगाजी काकडे, किरण अंबेकर, आरती काळम, सहसचिव मकरंद दिवाकर, जिल्हा संघटक जयश्री गोरे, प्रसिद्धी सचिव विनोद रापतवार, डॉ. अविनाश बुन्नावार, हरिचंद्र जिरेमाळी, डॉ. उत्तम इंगळे, रामचंद्र देठे आदी यावेळी उपस्थित होते.
येत्या काळात राजपत्रीत अधिकारी महासंघ हे विविध उपक्रमाचे नियोजन करीत आहे. कार्यालयीन कामकाजासह व्यक्तीगत आनंद, आझादी का अमृत महोत्सव, कौशल्य प्रशिक्षण, ताण-तणाव व्यवस्थापन या बाबींवर टप्प्या टप्प्याने भर देणार आहे. यासाठी संघटनात्मक उभारणी महत्वाची आहे. जिल्ह्यातील प्रत्येक राजपत्रीत अधिकारी आपले सभासदत्व लवकर घेऊन जबाबदारी पूर्ण करेल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांनी शासकीय अधिकाऱ्यांची आरोग्याबाबतही वेगळे नियोजन करून उपक्रम राबवू असे सांगितले. एकही अधिकारी सभासदत्वापासून वंचित राहू नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन डॉ. तुबाकले यांनी केले. मकरंद दिवाकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
नांदेड जिल्ह्यासह हिंगोली, परभणी जिल्ह्याची जबाबदारी समर्थपणे पेलविणारे अविनाश राऊत यांनी अल्पावधीतच महासंघाचे सर्वाधिक सभासदत्व करून घेतल्याबद्दल प्रदीप कुलकर्णी व डॉ. संजय तुबाकले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.