नांदेड(प्रतिनिधी)-भुखंडाच्या माध्यमातून श्रीखंड खाण्याचा प्रकार आता नवीन राहिला नाही. असाच एक प्रकार घडवून सन 2016 ते 2021 दरम्यान एक कोटी 20 लाख रुपयांची खंडणी वसुल करणाऱ्या 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक वकील आहे. सहा पैकी एकाला आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भीनी इंबिसात देशमुख यांनी सहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शिरीष बाबूलाल कासलीवाल (55) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार असर्जन भागात त्यांच्या एका जमीनीबद्दल राजाराम मारोतराव येवले रा.जाणापूर ता.लोहा, संजय रंगनाथ कदम रा.सोनखेड ता.लोहा, आनंदा अमृता येवले रा.बामणी ता.लोहा, दत्ता आनंदराव सूर्यवंशी रा.दगडगाव ता.लोहा, मोहनराव नारायणराव ढवळे रा.दगडगाव ता.लोहा आणि नोटरी करणारे ऍड.आर.के.टोम्पे यांनी सर्वांनी कट रचून शिरीष कासलीवाल आणि इतरांविरुध्द बनावट सौदाचिठ्ठ्या तयार करून त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. तसेच ती जमीन विकास कामात आणूण अडथळा करतो अशा धमक्या देवून त्यांना ब्लॅकमेल केले. यादरम्यान त्यांनी एकूण 1 कोटी 20 लाख रुपये खंडणी वसुल केली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 443/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 474, 384, 120 (ब) नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील खंडणीची रक्कम ही एक कोटी 20 लाख रुपये आहे. त्यामुळे हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. भुखंडांचे श्रीखंड झालेेली ही जागा गट क्रमांक 118, मोदी गार्डनजवळ, हस्सापूर ते असर्जन जाणाऱ्या पुलाजवळ आहे. हा पुल नवीन झाल्यानंतर या भागातील जमीनीचे भाव गगनाला भिडले आणि त्यातूनच त्यात बनावट पणा तयार करण्याची होड लागली. त्यामुळेच हा भुखंडांचे श्रीखंडाचा प्रकार घडला आहे.
आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक वडेन्ना आरसेवार यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज दि.21 जुलै रोजी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरिक्षक वडेन्ना आरसेवार, पोलीस अंमलदार दिलीप राठोड, तुकाराम कागणे, सतिश वंजारे, सुनिल राठोड यंानी पकडलेला आरोपी राजाराम मारोतराव येवले यास न्यायालयात हजर केले होते. तपासासाठी पोलीस कोठडीची विनंती करण्यात आली. न्यायाधीश भीनी इंबिसात देशमुख यांनी राजाराम येवलेला 6 दिवस अर्थात 27 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात आज पोलीस कोठडीत गेलेला राजाराम येवले हा काही दिवसापुर्वीच आर्थिक गुन्हा शाखेकडे असलेल्या एका तपास प्रकरणात सुध्दा पोलीस कोठडीत होता.
भुखंडाच्या श्रीखंडामध्ये 1 कोटी 20 लाखांची खंडणी वसुल करणाऱ्या येवलेला सहा दिवस पोलीस कोठडी