नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने कर्तव्यदक्ष प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनात आज दुसरी कार्यवाही करत दोन युवकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक बंदुकीची गोळी आणि एक दुचाकी गाडी असा ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या अत्यंत भारदस्त नेतृत्वात त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ती माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिली. आजच सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार विलास कदम, बालाजी यादगिरवाड आणि शेख कलीम हे बिलोली उपविभागात गेले होते. पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी दिलेली माहिती आपल्या पोलीस पथकाला दिली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक चिखलीकर यांच्या आदेशानुसार अत्यंत विद्युतगतीने गांधी चौक बिलोली येथे पोहचले. तेथे त्यांना गोविंद हणमल्लु नुगरावार (३२) व्यवसाय शेती रा.गांधी चौक बिलोली आणि विवेकानंद उर्फ राजू नरसिंहा सुर्गलोड (३२) रा.गांधी चौक बिलोली असे दोन युवक भेटले. त्यांच्याकडे दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.२६ झेड.७५०९ पण होती. पोलीस पथकाने त्यांच्याकडे तपासणी केली असता त्यांच्याकडे एक लोखंडी गावठी कट्टा(अग्नीशस्त्र), एक ८ एमएम अशी बंदुकीची गोळी सापडली. पोलीसांनी जप्त केलेल्या मुदेमालानुसार २० हजारांची गावठी पिस्तुल (कट्टा), ५०० रुपयांची बंदुकीची गोळी आणि ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी असा ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग व्यंकट माने यांच्या तक्रारीवरुन बिलोली पोलीस ठाण्यात विवेकानंद सुर्गलोड आणि गोविंद नुगरावार यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 173/2022 भारतीय हत्यार कायदा कलम करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरिक्षक सावित्रा रायबोळे यांच्याकडे देण्यात आला आहे.