फिल्मी स्टाईलने दोन हल्लेखोर वजिराबाद पोलिसांनी रेल्वेत पकडले;एक अल्पवयीन बालक

नांदेड,(प्रतिनिधी)- चिखलवाडी भागात मोबाईल दुकानावर साहित्य खरेदी करून दुकानदारास तलवारीने मारहाण करून पळून गेलेल्या दोघांना वजिराबाद पोलिसांनी फिल्मी स्टाईलने राज्य राणी या रेल्वे गाडीतून शोधून काढले आणि अटक केली आहे.

चिखलवाडी भागात अब्दुल रौफ अब्दुल रज्जाक यांची जनता नावाची मोबाईल शॉपी आहे.दिनांक २१ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या नंतर दोन युवक तेथे आले आणि त्यांनी ब्लूटूथ हे उपकरण खरेदी केले.त्यानंतर पैश्यांच्या देवाण घेवाणीतून काहीतरी वादावादी झाली.तेव्हा त्या दोघांनी तलवारीने अब्दुल रौफला मारहाण केली. बाजारात झालेल्या या हल्ल्याने काही वेळ दहशत तयार झाली होती.

घटनेची माहिती मिळताच वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी अत्यंत गतिमान पद्धतीने आपले सहकारी पोल्सी उप निरीक्षक प्रवीण आगलावे,पोलीस अंमलदार मनोज परदेशी,व्यंकट गंगुलवार,संतोष बेल्लूरोड,माणिक आव्हाड, संतोष अरलूवाड,दीपक पाटील आदींना सोबत घेऊन जनता मोबाईल शॉपी गाठली.घडलेली घटना समजून घेतली आणि आपण स्वःत आणि सहकारी पोलिसांना मेहनत करायला लावली. एक एक पायरी पुढे सरकत पोलीस नांदेडच्या रेल्वे स्थानकात पोंहचले.

आता येथे तर महत्वपूर्ण कामगिरी होती.रेल्वे फलाटावर मुंबईला जाणारी राज्यराणी एक्प्रेस हि रेल्वे उभी होती. रेल्वे प्रवाशांना त्रास न होता हल्लेखोर शोधायचे होते.एकी कडून पोलीस गेले तर हल्लेखोरांना रेल्वेच्या दुसरीकडून पळून जाण्याची संधी होतीच.तेव्हा जगदीश भंडरवार यांनी आपल्यातील आणि आपल्या पोलीस पथकातील पोलीस बाजूला सारले आणि अत्यंत सहज भावाने नियोजन करून रेल्वेत प्रवेश केला.थोडीशी धावपळ पण झाली परंतु अब्दुल रौफवर तलवारीने हल्ला करणारे दोन वजिराबाद पोलिसांनी अखेर पकडलेच.

पकडलेल्या दोघांमधील एकाचे नाव अमरजितसिंग सेवकसिंग राठोड (१९) असे आहे.दुसरा एक १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालक आहे. मुळात हा लहान बालक मूळात पंजाबचा राहणार आहे.सध्या तो आजीकडे आलेला होता.ब्लूटूथ घेतांना झालेल्या वादातुन हल्ला करून पळून जाण्याच्यासाठी रेल्वे गाठलेल्या दोघांना वजिराबाद पोलिसांनी मात्र अत्यंत जलदगतीने हालचाली करून पकडले आहे.

अब्दुल रौफ अब्दुल रज्जाक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी दोन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा क्रमांक २४९/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६,३२३,५०४,५०६,३४ आणि भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आलं आहे. या दोघांना पकडले तेव्हा विधी संघर्षग्रस्त बालकाच्या शर्टवर सुद्धा रक्त दिसत होते.ते बहुदा अब्दुल रौफ यांचे असावे अशी प्रथमदर्शनी माहिती प्राप्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *