बनावट नोटा प्रकरणी एकाला पोलीस कोठडी; हिमायतनगर पोलीसांनी फरार आरोपीला केली अटक 

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीस ठाण्यात बनावट नोटा प्रकरी दाखल झालेल्या गुन्ह्यातील एक आरोपी पोलीसांनी पकडल्यानंतर त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी केंद्रे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
हिमायतनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.11 जानेवारी 2021 रोजी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 11/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 489 (ब)(क) आणि 34 नुसार दाखल झाला. या गुन्ह्यात हिमायतनगर पोलीसांनी शेख सत्तार शेख बाबु रा.आंबेडकरनगर बारड, शेख महेमुद शेख रसुल रा.शेख फरीदनगर भोकर आणि विकास संभाजी कदम रा.टाकराळा ता.हिमायतनगर यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 100 रुपयांच्या पाच 200 रुपयांच्या 41 आणि 500 रुपयांच्या 47 अशा एकूण 93 बनावट नोटा जप्त केल्या होत्या. पुढील तपासानुसार या तिघांसह गजानन बालाजी माने रा.पारवा (बु) ता.हिमायतनगर यांना फरार रकान्यात दाखवून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार 24 जुलै 2022 रोजी फरार आरोपी गजानन बालाजी माने हा आपले गाव पारवा (बु) येथे आला आहे. त्यानुसार पोलीस निरिक्षक बिरप्पा भुसनुर, सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.जी.महाजन, पोलीस अंमलदार एन.बी.चौधरी, महिला पोलीस शिंगनवाड, कागणे, नागरगोजे आणि इंकलवाड यांनी फरार असलेल्या गजानन मानेला पकडले. आज दि.25 जुलै रोजी गजानन मानेला सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.जी.महाजन यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गजानन बालाजी माने यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *