नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या युगात कोणावर विश्र्वास ठेवावा आणि कोणावर नाही हा प्रश्न मोठाच आहे. प्रत्येक व्यावसायीकासाठी त्याचा ग्राहक हा देव असतो. आजच्या भाषेत जावाई असतो आणि तो सुध्दा काय त्रास देईल हे कळत नाही. असाच एक प्रकार नांदेड शहरात घडला. एका दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका व्यक्तीने त्या दुकान मालकाचा मोबाईलच चोरला. परंतू वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने हा मोबाईल तीन तासात शोधून काढला आणि मालकाला परत दिला.
या बाबत घडले असे की, 21 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास वजिराबाद, सुभाष रोड, डॉक्टर लव्हेकर हॉस्पीटल शेजारी असलेल्या न्यु गिरीष फोटो स्टुडिओमध्ये एक माणुस आला. या दुकानाचे मालक गिरीश बाऱ्हाळे आहेत. ग्राहक आला म्हणून गिरीष बाऱ्हाळे यांचे लक्ष पुर्णपणे त्याच्याकडेच होते. आपल्याला अर्जंट फोटो काढायचे आहेत असे तो सांगत होता. त्यावेळी बोलता बोलता गिरीश बाऱ्हाळे संगणकावर काही काम करत होते. तो माणुस निघून गेला आणि काही वेळाने गिरीश बाऱ्हाळेचे लक्ष मोबाईलवर गेले. पण तेथे मोबाईल नव्हता. घडलेला प्रकार वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना कळाल्यानंतर त्यांनी आपले सहकारी पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांना हा मोबाईल शोधण्याची जबाबदारी दिली.
पोलीस पथकातील पोलीस अंमलदार मनोज परदेशी, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, संतोष बेल्लूरोड, शरदचंद्र चावरे यांनी तांत्रिक मदत आणि स्वत: मेहनत घेवून हा चोरून नेण्यात आलेला मोबाईल तीन तासात शोधला आणि गिरीश बाऱ्हाळे यांना त्यांचा मोबाईल परत दिला. याबद्दल व्यापारी वर्गाने पोलीसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.
दुकानदाराची नजर चुकवून चोरलेला मोबाईल वजिराबाद पोलीसांनी 180 मिनिटात शोधला