किनवट(प्रतिनिधी)-एका 50 वर्षीय महिलेला मारहाण झाली. तिच्या इतर नातलगांना मारहाण झाली, रक्ताचा सडा पडला त्यानंतर किनवट पोलीसांनी चार जणांविरुध्द गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या परिस्थितीनुसार या गुन्ह्यातील कलमांच्या परिस्थितीला हलके केल्याचा आरोप दत्तनगर घोटी भागातील नागरीक करत आहेत.
मारहाण झालेल्या अवस्थेत अगोदर उपचार घेवून सुवर्णा प्रकाश राठोड (50) रा.दत्तनगर घोटी ता.किनवट यांनी किनवट पोलीसांसमक्ष दि.26 जुलै 2022 रोजी दिलेल्या जबाबानुसार 22 जुलै रोजी सायंकाळी मी व माझे कुटूंबिय घरी असतांना मुकूंद तुकाराम चव्हाण, राम मुकूंद चव्हाण, मंगलाबाई बाबू चव्हाण, नंदा मुकूंद चव्हाण हे आमचे शेजाीर आमच्या अंगणात आले. माझा नवरा प्रकाश गरडला राम चव्हाण म्हणाला मी अंघोळे करेल किंवा बाहेर करेल तु मला सांगणारा कोण असे म्हणून शिवीगाळ करू लागला व इतरांनी थापड बुक्यांनी माझ्या नवऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत मी किनवट पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली आणि सायंकाळी 7 वाजेच्यासुमारा घरी परत आले. तेंव्हा हे चौघे पुन्हा आले आणि आमच्या विरुध्द पोलीस ठाणयात तक्रार का दिली तेंव्हा मी सांगितले तुम्ही आम्हाला शिवीगाळ केली, जीवे मारतो म्हणून दिली. तेंव्हा मुकूंद चव्हाण म्हणाला की, तु आम्हाला शानपण शिकवतेस काय आणि त्याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने माझ्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. माझा नवरा प्रकाश, भाचा संजू सोडविण्यास आले. तेंव्हा त्यांनी राम चव्हाणने प्रकाश गरडच्या डाव्या हातावर कुऱ्हाडीने मारले. भाचा संजूच्या डोक्यात कुऱ्हाड टाकली आणि हे सर्व जमखी झाले. मारहाण करून परत जातांना आमच्या विरुध्द तक्रार दिली तर तुमच्या सर्व कुटूंबाला खतम करू असे सांगितले.
या तक्रारीवरुन किनवट पोलीसांनी गुन्हा क्रमांक 149/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 324, 325, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक झाली की नाही याबद्दलची माहिती प्राप्त झाली नाही. मारहाणची छायाचित्रे पाहिली असता भारतीय दंड संहितेच्या यापेक्षा वेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल व्हायला हवा होता पण त्याला कमी करण्यात आले आहे असे कांही घोटी वासियांचे म्हणणे आहे.
