नांदेड,(प्रतिनिधी)- कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ संधू उर्फ रिंदाचे अनेक साथीदार नांदेड जिल्हा पोलिसांनी तुरुंगात पाठवले आहेत. तरीही रिंदाचे नाव घेऊन खंडणी वसुलीचा व्यवसाय सुरूच आहे.असाच एक नांदेड जिल्ह्यात कार्यान्वीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने पकडला आहे.त्याने एकलाच नव्हे तर आपल्या ओळखीच्या अनेकांना खंडणी मागतांना रिंदाच्या नावाचा उपयोग केला आहे.त्यात अधिकारी सुद्धा सामील आहेत.
एकाव्यावसायिकाला एका माणसाने फोन करून सांगितले की,मला रिंदा साहेबानी आपला नंबर दिला आहे. तेव्हा फोन पे च्या माध्यमाने अगोदर ३० हजार आणि नंतर ५० हजार रुपये टाका असे सांगून रिंदा नावाची भीती दाखवून खंडणी मागितली आहे.या बाबत भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा क्रमांक २६७/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ५०७ नुसार गुन्हा दाखल केला.संजय बियाणी हत्याकांड घडल्यानंतर एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आली होती.त्या पथकाचे ३प्रमुख अत्यंत चाणाक्ष अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे हे आहेत.
पोलीस विभागाच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार या तपास पथकाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार,पोलीस अंमलदार विक्रम वाकडे,मोहन हाके,शिलराज ढवळे,राजकुमार डोंगरे,सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी,पोलीस अंमलदार राजेश सिटीकर यांनी अत्यंत त्वरित प्रयत्न करून वरवंट ता.कंधार येथील देविदास गणेश गायकवाड (४५) यास पकडले.त्याच्या फोनची माहिती घेतली तेव्हा अजबच बाबी समोर आल्या.१ आणि २१ ऑगस्ट रोजी देविदासने जवळपास खंडीभर ओळखीच्या लोकांना फोन करून रिंदाचे नाव सांगून खंडणी मागितली होती.त्यात अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.देविदास गायकवाड हा माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोट मध्ये पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे जनतेला आवाहन आहे की,जनतेतील कोणत्याही व्यक्तीला कोणीही धमकी देऊन कोणत्याही माध्यमातून खंडणीची मागणी करीत असेल तर अश्या माणसांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून माहिती/तक्रार द्यावी पोलीस विभाग अश्या खंडणीखोरांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणारच.जनतेने आपल्या जीवनात कोणतीही भीती बाळगू नये असे आवाहन केले आहे.