
नांदेड (प्रतिनिधी)- गल्लीत कोण मोठा हे ठरविण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून नदीकाठी असलेल्या भीम घाटावर जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास याठिकाणी दुचाकीवर आलेल्या काही हल्लेखोरांना तेथील युवकांनी पिठाळून लावले आहे. चर्चा वेगळ्यावेगळ्या होत आहेत, परंतु त्याचा भक्कम पुरावा मात्र कोणी सांगायला तयार नाही.
दुपारी 2 वाजेच्या शहरात एक ‘आवई’ उठली की, भीम घाटवर फायरिंग झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरीक्षक प्रविण आगलावे, भगवान मोरे, अनेक पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग माने, शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांचे सहकारी अनेक पोलीस अंमलदार भीमघाटावर पोहचले. प्रसार माध्यमांचेही अनेक प्रतिनिधी त्याठिकाणी पोहचले. त्याठिकाणी तीन दुचाकी गाड्यांची तोडफोड केलेली अवस्था दिसत आहे. काही जणांनी सांगितले फायरिंग झाली, पण त्यात पोलीस विभागाकडून दुजारा मिळाला नाही. घटनास्थळी एक तलवार पण दिसत होती. पोलीस पथकातील आरसीपी पथक सुद्धा घटनास्थळी आले होते. परिस्थिती तणावपूर्ण पण शांततेत आहे.
याठिकाणी एका भोजन समारंभात काही दिवसांपुर्वी झालेल्या वादानंतर या भागात वर्चस्व कोणाचे असे दाखविण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे काही जण सांगतात. याठिकाणी चाललेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे काही गुन्ह्यांची नोंद सुद्धा झाली आहे. आज घडलेल्या प्रकारानंतर अद्याप पोलीस ठाण्यापर्यंत कोणीच पोहचलेले नाही. पण काही तरी प्रकार नक्कीच घडला आहे आणि त्याच्याबद्दल काय गुन्हा दाखल होईल हे काही अद्याप स्पष्ट होत नाही. तीन दुचाकींवर आलेल्या हल्लेखोरांना तेथील जमावाने पिटाळून लावले आणि तिन्ही दुचाकींची तोडफोड केली ऐवढेच आता तरी सांगता येईल. दुचाकी गाड्यांच्या क्रमांकावरुन गाड्या कोणाच्या हे तर कळणारच आहे. वजीराबाद पोलीस ठाण्यात याबद्दलच माहिती घेतली असताना आमच्याकडे अद्याप काही अर्ज आला नाही, असे सांगण्यात आले.पण गावात दहशत पसरवणारे कोण आहेत त्यांचा शोध घेवून कार्यवाही नक्कीच अपेक्षीत आहे.समोर काही दिवसात महानगरपालीकेची निवडणुक येणार आहे.त्या निवडणूकीत आपले वर्चस्व दाखवण्यासाठी अशा प्रकारांचा उपयोग केला जातो हे काही नवीन नाही.पण याअश्या प्रकारांमूळे आपल्या गावात दहशत माजते आहे हा विषय खरोखरच गंभीर आहे.
