नांदेड(प्रतिनिधी)- भोकर शहरात एक जबरी चोरी, एक घरफोडी तसेच धर्माबाद आणि अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या असे संपत्तीविरूद्ध प्रकार घडले आहेत. या प्रकरणात 2 लाख 42 हजार 800 रूपयांचा ऐवज लंपास झाला आहे. जबरी चोरी प्रकरणात हा प्रकार तांत्रिक स्वरूपाचा वाटतो अशी नोंद आहे.
रामनगाव ता. भोकर येथील दिलीप पतंगराव कदम हे 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 ते 8.30 वाजेदरम्यान नांदा बसस्थानकाजवळ ते एका पान टपरीवर गेले. तेथे बलारेड्डी किशोर निमकर आणि शाहरूख अन्वर अली शेख या दोघांनी त्यांचा हात धरून बाजूला नेले आणि त्यांच्याकडील 20 हजार रूपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली व मारहाणही केली. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत, अर्थात हा प्रकार तांत्रिक स्वरूपाचा वाटतो, अशी नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक तांबोळी अधिक तपास करीत आहे
भोकर शहरातील गंदेवार कॉलनीमध्ये 29 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान एक बंद घर चोरट्यांनी फोडले आहे. या घरातील प्रेमजित प्रल्हादराव सर्जे (देशमुख) हे त्यांच्या वडिलांना उपचारासाठी मुंबई येथे घेऊन गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी घर फोडले आणि त्यातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 61 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा गुन्हा भोकर पोलिसांनी दाखल केला असून पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.
धर्माबाद तालुक्यातील तालुक्यातील मौ. जारीकोट येथील नारायण संभाजी उपोड हे बाजार करण्यासाठी धर्माबादला गेले आणि त्यांच्या पत्नी दि. 3 ऑगस्ट रोजी शेतात गेल्या. या दरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने 62 हजार रूपये किंमतीचे चोरून नेले आहेत. धर्माबाद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक माधव वाडेकर तपास करीत आहेत.
अर्धापूर तालुक्यातील देळूब (बु.) येथे 4 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर तिरूपती गोविंद डोखारे यांच्या घराचे लोखंडी गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि झोपलेल्या अवस्थेतील त्यांच्या आजी, मामी आणि पत्नी यांच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने 79 हजार 800 रूपये किंमतीचे चोरून नेले आहेत. अर्धापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तय्यब हे करीत आहेत.