नायगावमध्ये जर्दा, सिगरेट पॉकीट चोरी; नांदेड शहरात नगरसेवक कोकुलवारची पतसंस्था फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव शहरातील एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी जर्दा, सिगरेट पॉकीट असे 2 लाख 70 हजारांचे साहित्य चोरले आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंधन बॅंक व्यंकटेशनगर तरोडा फोडून चोरट्यांनी संगणक साहित्य 16 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहे. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीओम नागरी पथसंस्था हे फोडून त्यातील संगणक साहित्य 18 हजार रुपये किंमतीचे चोरले आहे. या चोरट्यांकडे अग्नीशस्त्रासारखे दिसणारे शस्त्र होते. ही हरिओम संस्था कॉंगे्रस नगरसेवक नागेश कोकुलवार यांची आहे.
नायगाव येथील साईस्मरण किराणा दुकान फोडून चोरट्यांनी त्याची सुर्यछाप जर्दा, सिगरेट पॉकीट, रोख रक्कम, संगणक साहित्यातील डीव्हीआर असा 2 लाख 70 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत प्रविण माधव सोमवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 5 ऑगस्टच्या रात्री 10 ते 6 ऑगस्टच्या पहाटे 7 वाजेदरम्यान घडला होता. नायगावचे पोलीस निरिक्षक आभिषेक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
मंगेश अशोक निकम हे बंधन बॅंकचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तरोडा पाटी, मालेगाव रोड येथे असलेली ही बॅंक 6 ऑगस्टच्या रात्री 1 ते 4 वाजेदरम्यान फोडून चोरट्यांनी त्यातील आयपी कॅमेरा आणि डीव्हीआर 16 हजार रुपये किंमतीचा चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गोणारकर अधिक तपास करीत आहेत.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनकर कॉलनीमध्ये कॉंगे्रस नगरसेवक नागेश गोविंदराव कोकुलवार यांची हरीओम नागरी पतसंस्था आहे. नागेश कोकुलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ऑगस्टच्या रात्री 2 ते 4 वाजेदरम्यान 6-7 लोकांनी त्यांच्याजवळ रिव्हाल्वर सारखे दिसणारे हत्यार बाळगुन हरीओम नागरी पतसंस्था फोडली आणि त्यातून संगणक असा 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *