नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांनी आपल्यासाठी राहायला निवारा नाही या प्रमाणे अर्ज देऊन महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पत्रकार सहवास गृहनिर्माण संस्था या नावावर बेघरांची संस्था बनवून मनपाची अर्थात नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकाच्या मालकीची दोन एकर जागा लाटली. त्या जागेतून आज कोट्यावधी रुपये बेघर पत्रकारांनी बनवले आहेत. याबाबत एका माजी सहाय्यक विधी अधिकाऱ्याविरुध्द शिस्त भंगाची कार्यवाहीपण करण्यात आली होती.
महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी अणि तसेच पदाधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून श्रीकृष्ण निळकंठराव झाकडे रा.सध्या औरंगाबाद यांनी पत्रकार गृहनिर्माण संस्था भुखंड घोटाळा बाबत दोषींवर कार्यवाही करण्यात यावी म्हणून 22 जानेवारी 2020 रोजी शासनाकडे अर्ज सादर केला. तसेच 26 जानेवारी 2020 रोजी याबाबत मी निषेध व्यक्त करणार असल्याचे त्या अर्जात लिहिले होते. सर्वसामान्यपणे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन महत्वाच्या दिवसाप्रसंगी कोणी असे करत असेल तर त्याची दखल लवकरच घेतली जाते. पण श्रीकृष्ण झाकडेच्या या अर्जावर तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची दिशाभुल करून श्रीकृष्ण झाकडेविरुध्द 24 जानेवारी 2020 रोजी शिस्तभंग केली अशा आशयाची नोटीस काढण्यात आली. कारण ते 26 जानेवारीला निषेध व्यक्त करणार होते. याबाबतचे उत्तर 27 जानेवारी 2020 रोजी श्रीकृष्ण झाकडे यांनी कशा पध्दतीने हा बेघर पत्रकारांचा भुखंड घोटाळा घडला आहे असा खुलासाही सादर केला होता.
या घटनाक्रमांवरुन बेघर पत्रकारांनी लाटलेली नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकाच्या मालकीची दोन एकर जागा बेघर पत्रकारांच्या घशात जावू नये म्हणून श्रीकृष्णाने हे पाऊल उचलले होते. परंतू कंसांची संख्या जास्त झाली आणि श्रीकृष्णाच्या बोलण्यावर, लिहिलेल्या अर्जावर, आणि त्याच्या कृतीवर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. कारण या बेघर पत्रकारांच्या भुखंडांमध्ये बरेच मोठे प्रभावशाली अधिकारी लिप्त आहेत. असा नवीन अर्ज श्रीकृष्ण झाकडे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला आहे.
वास्तव न्युज लाईव्ह मागील 16 आणि आजचा 17 वा बेघर पत्रकारांच्या भुखंडाचा वृत्तांत लिहित आहे. तरी पण बेघर पत्रकारांच्या जबरप्रभावामुळे आजपर्यंत काही एक कार्यवाही करण्याची हिंमत महानगरपालिकेने दाखवलेली नाही. सर्वसामान्य नागरीकांनी सुध्दा आमच्या मालकीची जमीन बेघर पत्रकारांना का दिली असा साधा प्रश्न सुध्दा विचारलेला नाही. बेघर पत्रकारांमध्ये आता तर असे व्यक्ती आहेत. की ज्यांचे “अच्छे दिन आले आहेत’ ते सुध्दा अडीच वर्षानंतर आता पुढच्या अडीच वर्षापर्यंत त्यांची चलती राहणार आहे त्यामुळे आता महानगरपालिका काही करेल असे तर वाटतच नाही. दुर्देवाने सरकार अस्थिर झाले तरच महानगरपालिका या बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्यामध्ये काही तरी कार्यवाही करण्याच्या परिस्थितीत येईल.
बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्याबाबत श्रीकृष्णाने उचलेला आवाज सुध्दा दाबला