नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका युवकाला पकडून त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्यांची किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, पोलीस अंमलदार जसपालसिंघ कोलो, राजेंद्र ठाकरे, शेख इजराईल, हेमंत कांबळे, श्रीराम दासरे, राजीव बोधगिरे आणि अकबर पठाण हे सर्व शहरात गस्त करत असतांना त्यांना अत्यंत गुप्त आणि खात्रीलायक माहिती मिळाली की, दुचाकी गाड्या चोरी करणारा आरोपी आकाश आनंदा बादवड हा पावडेवाडी जवळील सुवर्णानिकेतन शाळेसमोर आहे. पोलीस पथकाने तेथे जावून आकाश बादवडला ताब्यात घेतले. तेथे तीन दुचाकी गाड्या उभ्या होत्या. त्यातील एक बजाज प्लसर ८० हजार रुपये किंमतीची, एक हिरो होंडा कंपनीची दुचाकी ५० हजार रुपये किंमतीची आणि एक हिरो होंडा कंपनीची १५ हजार रुपये किंमतीची दुचाक गाडी पोलीस पथकाला सापडली. या तिन्ही गाड्यांंची एकूण किंमत १ लाख ४५ हजार रुपये आहे. आकाश आनंदा बादवड(२१) व्यवसाय मजुरी रा.दहिकळंबा ता.कंधार जि.नांदेड ह.मु.पावडेवाडी हा आहे. त्याने या सर्व दुचाकी गाड्या चोरी केल्या असल्याचे सांगितले. पोलीसांनी याबाबत तपासणी केली असता विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २११/२०२१ आणि गुन्हा क्रमांक २६८/२०२२ असे दोन गुन्हे दुचाकी गाडी चोरी संबंधाने दाखल आहेत. पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल लिहुन दुचाकी गाड्या आणि त्यांना चोरणारा चोरटा आकाश आनंदा बादवड विमानतळ पोलीसांच्या स्वाधीन केला आहे.
चोरी करणार्या गुन्हेगाराला अटक करून तीन दुचाकी गाड्या जप्त करणार्या पोलीस पथकाचे अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.