नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहेत म्हणून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. यात स्वराज्य महोत्सव हा एक कार्यक्रम शासनाने नियोजित केला आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट हा आठवडा सुनिश्चत करण्यात आला आहे. स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी समुह राष्ट्रगीत गायनाने सकाळी 11 वाजता होईल.
महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभागाने 10 ऑगस्ट 2022 रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार 17 ऑगस्ट रोजी स्वराज्य महोत्सव अंतर्गत समुह राष्ट्रगीत गायन सकाळी 11 वाजता होईल असे जाहीर केले आहे. समुह राष्ट्रगीत गायन सर्वच ठिकाणी एकदाच व्हावे असे या परिपत्रकात नमुद आहे. सकाळी 11 ते 11.01 या एका मिनिटामध्ये देशभर हे राष्ट्रगाण होणार आहे. जो नागरीक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी उभे राहुन त्याने हे गायन पुर्ण करायचे आहे. या कार्यगक्रमात ग्रामस्तरावर वार्ड स्तरावर तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर सर्व शासकीय यंत्रणा यात सहभागी होतीलच, यात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी सहभागी होणे अनिवार्य आहे. या कार्यक्रमाची जाणीव, जागृती आणि प्रचार मोठ्या स्वरुपात करावा असे परिपत्रकात म्हटले आहे. हे परिपत्रक राज्य शासनाने शासनाच्या संकेतस्थळावर 202208101829260223 नुसार प्रसिध्द केले आहे. या परिपत्रकावर सहसचिव सौरभ विजय यांची स्वाक्षरी आहे.
17 ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आहे त्या ठिकाणी थांबून सकाळी 11 वाजता समुह राष्ट्रगीत गायन करा