नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशातील प्रत्येक नागरीकाच्या घरावर राष्ट्रध्वज फडकला पाहिले यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमातील राष्ट्रध्वज स्वत: खरेदी करून तो आपल्या घरावर लावायचा आहे. परंतू काही जणांनी त्यासाठी विविध प्रकारे निधी जमवून ते राष्ट्रध्वज वाटप केले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी 30 ते 100 रुपयांमध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध होतील असे सांगितले होते. पण आजच्या परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा धंदा सुरू झाला असून किंमत 300 रुपये झाली आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज उपलब्ध नाहीत असे फलक लावण्यात आले आहेत. कोण करत आहे राष्ट्रध्वजाचा धंदा याचा शोध सुध्दा व्हायला हवा.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेळ्या कार्यक्रमाचे आयोजन केंद्र आणि राज्य शासन मिळून करत आहेत. शाळा, महाविद्यालये, अनेक संस्था यांनी याबाबत पुढाकार घेवून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमांमध्ये हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा या कार्यक्रमासाठी दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरीक आपल्या घरावर तिरंगा लावू शकतो. त्यात भारतीय लोकशाहीतील सर्वात शेवट्या व्यक्तीपर्यंत तिरंगा ध्वज पोहचविण्यासाठी प्रयत्न झाले. अनेकांनी ध्वज उपलब्धतेसाठी निधी जमवला. त्यातून वार्डनिहाय, स्वस्त धान्य दुकानदारामार्फत पोस्ट कार्यालयात, महानगरपालिकेत, पोलीस अधिक्षक कार्यालयात अशा विविध कार्यालयामधून त्या निधीने उपलब्ध झालेले ध्वज वाटप करण्यात आले. काही जण तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी तयार आहेत. यंदाच्या या कार्यक्रमात सर्वत्र खादी कपड्याचे तिरंगे ध्वज उपलब्धतेची समस्या येईल म्हणून पॉलीस्टर कपड्याचे ध्वज सुध्दा लावता येतील असे जाहिर करण्यात आले.
या संदर्भाने मागील काही दिवसांचा आढावा पाहिला तर अनेक अधिकाऱ्यांना कांही लोकांचे कॉल येत होते. आमचे एवढे लाख ध्वज विक्री करून द्या पण आजची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे. आज राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा धंदा सुरू झाला आहे. ध्वजाची किंमत 400 रुपये सांगितली जात आहे आणि अनेक ठिकाणी तिरंगे ध्वज उपलब्ध नाहीत असे फलक लावण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील या आनंदोत्सवात कोण राष्ट्रध्वजाचा धंदा करत आहे याचा शोध सुध्दा होण्याची गरज आहे.
कोण करतय राष्ट्रध्वजाचा “धंदा’?; “धंदा’ शोधण्याची जबाबदारी कोणाची?