देगलूर(प्रतिनिधी)- तालुक्यातील देगाव येथून प्रवासी घेऊन नांदेडकडे येणाऱ्या क्रुजर जीपचा टायर फुटून कृष्णूरजवळ गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात जागेवरच दोन जण ठार झाले असून आठ गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, देगलूर तालुक्यातील देगाव येथून आणि इतर ठिकाणाहून प्रवासी घेऊन के. एच. ३२ – एम. ६४२३ ही क्रुजर जीप गुरुवारी नांदेडकडे निघाली. भरधाव वेगात निघालेली ही क्रुजर सायंकाळी पाचच्या सुमारास कृष्णूरजवळ अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगातील या क्रुजरचा टायर फुटून क्रुजर रस्त्यालगतच्या खड्डयांमध्ये जाऊन उलटली. या अपघातात एकूण प्रवाशांपैकी दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुत्यमुखी पडलेल्यांमध्ये आमदवी शे. खुलताबी (वय ५०, रा. देगाव), महेबुब बाबूशेख (वय ४५, रा.गोजेगाव मुक्रमाबाद). अपघात होताच जखमी प्रवाशांनी आक्रोश केला. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त क्रुजर जीपकडे धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पुरी यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर मयत हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. देगाव येथून निघालेली क्रुजरही भरधाव वेगात होती. टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. यातून हा गंभीर अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.