नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने 26 ऑगस्टच्या रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना ताब्यात घेतले आहे आणि इतर चार जणांचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, सुरेश घुगे, बालाजी तेलंग, बालाजी यादगिरवाड, हेमंत बिचकेवार आणि शेख कलीम हे रात्रीची गस्त करत असतांना पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत टापरे चौकाजवळ काही माणसे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली. लातूर-नांदेड जाणाऱ्या वळण रस्त्यावर बसलेल्या या मंडळीला पोलीसांनी अत्यंत पध्दतशिरपणे ताब्यात घेतले. त्यावेळी 4 लोक पोलीसांच्या हाती लागले. इतर चार पळून गेले.
पकडलेल्या चौघांची नावे राजेंद्र उर्फ दादा छगन काळे(48), संजय उर्फ पिल्या उर्फ भैय्या राजेंद्र उर्फ दादा काळे (25), नितीन भारत डिकले (28) तिघे रा.मस्सा ता.कळंब जि.उस्मानाबाद आणि प्रदीप बाळासो चौधरी (27) रा.उरळी कांचन ता.हवेली जि.पुणे अशी आहेत. या चौघांनी पळून गेलेल्यांची नावे सांगितली ती रविंद्र बाप्पा काळे, शंकर सुरेश काळे, अनिल रमेश शिंदे सर्व रा.मस्सा ता.कळंब जि.उस्मानाबाद आणि अरुण बबन शिंदे रा.मोहा ता.कळंब जि.उस्मानाबाद अशी आहेत. पोलीस पथकाने त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी त्यांनी बाळगलेले सर्व साहित्य जप्त केले. तसेच एक चार चाकी गाडी सुध्दा जप्त केली. या सर्व मुद्देमालाची किंमत 13 लाख 33 हजार 700 रुपये आहे.
सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 399, 402 आणि भारतीय हत्यार कायद्याचे कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 520/2022 दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे आदींनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
दरोडा टाकण्याच्या तयारीतील चार जण एलसीबीने पकडले