नवी आबादी परिसरात शाळा फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-नवी आबादी भागात एक शाळा फोडून चोरट्यांनी 44 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच एक लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
नवी अबादी परिसरातील उर्दु शाळा बैतुलूम या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक महंम्मद अब्दुल जमीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्टच्या सायंकाळी 4 ते 26 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजेदरम्यान नवी अबादी भागातील बैतुलूम ही उुर्द शाळा कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी फोडली. शाळेच्या वेगवेगळ्या खोल्यांमधील संगणकाचे साहित्य, संचिका आणि इतर स्टेशनरी साहित्य असा 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 318/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 457 आणि 380 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार वाघमारे हे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील हद्दीतील कॅन्सर हॉस्पीटलसमोरून मोहम्मद खालेद मोहम्मद इसाक यांची दुचाकी गाडी क्रमांक ए.पी.01 ए.सी.8638 ही कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 521/2022 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंदे याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
सदानंद माधव सुर्यवंशी यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एम.0263 ही 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 ते सकाळी 6 वाजेदरम्यान वझरगा ता.देगलूर येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. देगलूर पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 402/2022 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
शिवराम पिराजी मेटकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.8494 ही गाडी 75 हजार रुपये किंमतीची दि.10 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 ते 11 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 317/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार वाघमारे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *