नांदेड(प्रतिनिधी)-एका पोलीस अंमलदाराचे मोबाईल चोरून त्या मोबाईलमधील सिम कार्डचा वापर करून पोलीस कर्मचाऱ्याच्या बॅंक खात्यातील 1 लाख 76 हजार रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यावर हस्तांतरीत केले आहेत.
इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार धिरजकुमार गंगाधर कोमुलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.8 ऑगस्टच्या रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान आनंदनगर रस्त्यावर कोणी तरी त्यांच्या खिशातील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला. त्यामध्ये जीओ कंपनीचे सिमकार्ड क्रमांक 8378967999 चोरून आपली ओळख लपवून कोमुलवार यांच्या एसबीआय बॅंक खात्यातून 1 लाख 76 हजार रुपये वेगवेगळ्या बॅंकांच्या खात्यावर वर्ग केले. या प्रकरणात चोरलेला मोबाईल आणि बॅंकेतील 1 लाख 76 हजार असा 1 लाख 96 हजार रुपयांचा झटका पोलीस अंमलदार कोमुलवार यांना बसला आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 321/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379 आणि तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ब), 66(क) आणि 66(ड) प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक नितीन काशीकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलीस अंमलदाराचा मोबाईल चोरून एक लाख 76 हजार रुपये ऑनलाईन चोरले