नांदेड(प्रतिनिधी)-एका युवतीला आपल्या पुरूष मित्रासोबत शेतात बोलतांना पाहुन 9 जणांनी त्या दोघांना मारहाण केली, त्यांचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ प्रसार माध्यमांच्या आधारे प्रसारीत करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी 9 जणांपैकी सहा जणांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला आहे.
दि.12 जून 2015 रोजी एक 20 वर्षीय युवक आणि त्याची मैत्रीण दोघे एका स्कुटीवर बसून अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेताजवळ जाऊन बोलत बसले असतांना अर्धापूर येथील दहा ते 12 युवकांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या जवळील मोबाईल स्वत:कडे घेतले दोघांना मारहाण केली आणि ही मारहाण होत असतांना त्यांचा व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ प्रसार माध्यमांच्या मार्फत त्याच युवकांनी व्हायरल केला आणि त्यानंतर 15 जुन 2015 रोजी अर्धापूर पोलीस ठाण्यात शेख कलीम शेख सलीम (30), मोईज खान आगा खान (27), शेख समीर शेख नजीर (30), जबीर नजीर अहेमद (20), अब्दुल गफार शेख हमजा(32), सय्यज हनीफ सय्यज हाफीज (19), शेख आवेस शेख आरेफ (19) आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालक अशा 9 जणांविरुध्द तक्रार दिली. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 395, 397, 354 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 प्रमाणे गुन्हा क्रमांक 89/2015 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सतिश गायकवाड यांनी पुर्ण केला आणि न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
न्यायालयात याप्रकरणी 13 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी शेख कलीम शेख सलीम, मोईज खान आगा खान, शेख समीर शेख नजीर, जबीर नजीर अहेमद, सय्यद हानीफ सय्यज हाफीज, शेख आवेस शेख आरेफ अशा 6 जणांना दोषी मानले आणि त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 34 नुसार एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये रोख दंड ठोठावला. इतर चार जणांंची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली आहे. याच संदर्भाने माहिती सांगण्यात आली की, एका आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणात सरकार पक्षाची बाजू ऍड.एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी मांडली. याप्रकरणात पैरवी अधिकाऱ्याची भुमिका अर्धापूरचे पोलीस अंमलदार व्ही.एम.पठाण यांनी समर्थपणे पार पाडली.
युवक-युवतीला शेतात मारहाण करून त्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या सहा जणांना सक्तमजुरी