स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या 12 दुचाकी गाड्या आणि 5 मोबाईल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, असे एकूण 12 दुचाकी चोरींचे उघडकीला आणले आहे. सोबतच एका दुचाकीचा गुन्हा पोलीस अभिलेखावर उपलब्ध नाही. तसेच चोरीचे पाच मोबाईल पकडले आहेत. पण त्याबद्दल सुध्दा गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्राप्त होत नाही. या सर्व चोरी प्रकरणांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेने एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. 6 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने आपल्या गुप्त माहिती आधारे महेश बालाजी मुंडे (19) रा.शिवनगर नांदेड,सय्यद इमरान सय्यद चॉंद (19) रा.शिवनगर नांदेड आणि विश्र्वास परमेश्र्वर शिंदे (19) या तिघांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले तेंव्हा विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेले दुचाकी चोरीचे सहा गुन्हे, शिवाजीनगरचे तीन आणि भाग्यनगरचे दोन असे 12 गुन्हे उघडकीस आणले आहे. सोबतच एक दुचाकी अशी आहे की, चोरट्यांच्या माहितीनुसार त्यांनी ती हिंगोली जिल्ह्यातून चोरली आहे. तसेच स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पाच चोरीचे मोबाईल याच चोरट्यांकडून जप्त केले आहेत. त्या पाच मोबाईलचे गुन्हे सुध्दा पोलीस अभिलेखावर उपलब्ध नाहीत. या चोरट्यांकडून 6 लाख 49 हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी जप्त केला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार रुपेश दासरवाड, मारोती तेलंग, संग्राम केंद्रे, सुरेश घुगे, बालाजी तेलंग, मोतीराम पवार बालाजी यादगिरवाड, महेश बडगु, किरण बाबर, शेंदे आणि हेमंत बिचकेवार आदींचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *