
नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात शहरात श्री गणेशाचे आगमन झाले. अनेक सार्वजनिक गणेशमंडळांनी आणि नागरीकांनी आप-आपल्या घरात गणपती मुर्ती स्थापना करून आशिर्वाद प्राप्त केला.
भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या दिवशी दरवर्षी श्री गणरायांचे आगमन होत असते. त्याची तयारी वर्षभरापासून सुरू असते. मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध रस्त्यांवर गणपती पुजनासाठी लागणारी हराळी, आघाडा, कमळ फुले, आंब्याची पाने आणि सजावटीचे साहित्य तसेच गणेशमुर्तींची विक्री करणारी दुकाने थाटलेेली होती. यामध्ये यावर्षी पर्यावरण पुरक गणपतींची दुकाने जास्त दिसत होती. पर्यावरण पुरक गणपतीच्या मुर्तीची किंमत मात्र जास्त होती. एका दुकानदाराने आपल्या दुकानात पश्चिम बंगाल येथून काही श्री गणेश मुर्त्या आणल्या होत्या. त्याने गणेशमुर्तींची किंमत निश्चित केली नव्हती पण आपल्या इच्छेनुसार गणेशमुर्ती घेणाऱ्याने त्या संबंधाची रक्कम संबंधीत दुकानात ठेवलेल्या एका दानपेटी टाकायची होती. या दानपेटीतील सर्व रक्कम हा दुकानदार गोशाळेला देणार आहे.
श्री गणेशाचा जन्म भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या दुपारी आहे. त्यानुसार बऱ्याच जणांनी सकाळपासून विविध साहित्य खरेदी करून श्री गणेशाची मुर्ती आणून पुजा मात्र दुपार झाल्यावरच केली. अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजत-गाजत आपल्या श्री गणेशमुर्ती गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिरवणूकीसह आपल्या नियोजित स्थळी आणल्या. अनेक ठिकाणी वृत्तलिहिपर्यंत गणपतीची स्थापना झाली होती.
काही सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक तयारी वृत्तलिहिपर्यंत सुरू होती. त्या श्री गणेशमुर्ती सायंकाळी, रात्री 10 पर्यंत आप-आपल्या पंडालमध्ये स्थापीत होतील. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील पोलीस दल श्री गणेश स्थापना कार्यक्रमामध्ये गोंधळ होणार नाही, सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि पुढील दहा दिवस श्री गणेश उत्सव आनंद व उत्साहात साजरा व्हावा यासाठी परिश्रम घेत आहे.
