नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैधरित्या नशेचे पदार्थ, देशी दारु विक्री करणाऱ्या आठ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 22 हजार 700 रुपयांचा नशा द्रव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पण काही ठिकाणी कार्यवाही मात्र झालेली नाही.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार धर्माबाद येथे दोन अवैध दारु विक्री करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात भिमराव हरी चव्हाण रा.धानोरा तांडा हा रेल्वे स्थानक धर्माबादच्या पाठीमागे टिनशेडमध्ये गावठी दारु विक्री करत होता.भिमराव राठोडकडून 2 हजार 500 रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. तसेच एलबीएस कॉलेजला जाणाऱ्या रस्त्यावर गौतम मनोहर तंगाने हा विनापरवाना देशी दारु विक्री करत होता. त्याच्याकडून 24 बॉटल्या 1680 रुपयांच्या जप्त करण्यात आल्या आहेत.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबाराव हनमंत मुंडकर हा जुनागंज भागातील देगलूरनाकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अवैधरित्या दारु विक्री करत होता अशा 10 बॉटल्या 1800 रुपयांच्या त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजू लक्ष्मण मेटकर हा शिंदी हे नशेचे द्रव्य भरलेले 40 पॉकीट बाळगुण तिची चोरटी विक्री करत असतांना सापडला त्याच्याकडून 1600 रुपये किंमतीचे शिंदी पाकीट जप्त करण्यात आले आहे.
मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्याहद्दीतील मौजे दापका तांडा येथे बंडू नामदेव राठोड हा बेकायदेशीररित्या प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये हातभट्टीची गावठी दारु विक्री करतांना सापडला. या दारुची किंमत 1500 रुपये आहे.पवनाळा ता.माहुर येथे शिवाजी बंडू राठोड हा मोहफुलांचे 80 लिटर रसायन तयार करून त्यापासून गावठी तयार करण्याचे काम करत होता. 5600 रुपयांचे हे मोहफुलांचे रसायन माहुर पोलीसांनी जप्त केेले आहे.
मरखेल येथे तयार होणाऱ्या गावठी हातभट्टी दारुच्या अड्यावर मरखेल पोलीसांनी छापा टाकून तेथून 13 लिटर हातभट्टीची दारु, 1300 रुपये किंमतीची जप्त केली आहे. ही गावठी दारुची भट्टी व्यंकट विठ्ठल खुठेमारे याची आहे. तसेच लोहा, ते पालम जाणाऱ्या रस्त्यावर श्रीनिवास व्यंकय्या बंडी हा तेलंगणा राज्यातील रहिवासी 96 देशी दारुच्या बाटल्या बाळगुन त्या चोरट्या पध्दतीने विक्री करत होता. या दारुच्या बाटल्या 6720 रुपये किंमतीच्या आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात आठ ठिकाणी अवैध नशेचे पदार्थ, देशी दारु, विदेशी दारु विक्रीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
आजपासून सुरू होणाऱ्या श्री गणेश महोत्सवादरम्यान पहिल्या दिवशी आणि श्री गणेशांच्या निरोप समारंभाच्या दिवशी दारु विक्री बंद ठेवली जात असते आणि याचाच फायदा अशा पध्दतीने चोरट्या मार्गाने दारु विक्री करणाऱ्यांना मिळतो. नियमित दरापेक्षा जादा दरात दारु विक्री होते आणि त्यांचा गल्ला भरतो. पोलीसांनी केलेल्या या एकंदरीत कार्यवाहीने पुर्णपणेच आज दारु विक्री बंद झाली काय हा एक संशोधनाचा विषय आहे.
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या अवैध दारु विक्रीच्या धंद्यामुळे अनेकांचे घर भरले आहे. पण कालच्या अवैध दारुविरुध्दच्या कार्यवाहींमध्ये शिवाजीनगर पोलीसांनी मात्र कोणतीही कार्यवाही केलेली नाही. गेल्या आठवडा भरात या नशेच्या कारणातून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे सुध्दा घडले आहेत. शिवाजीनगर पोलीस मात्र अवैध दारु विक्री प्रकरणात गप्प आहे.
जिल्ह्यात अवैध दारु विक्रेत्यांवर आठ गुन्हे; मात्र शिवाजीनगर पोलीस कार्यवाहीपासून ‘वंचीत’