नांदेड(प्रतिनिधी)-मोटार वाहन कायद्याअंतर्गत पोलीसांना ई चालन मशिन देण्यात आली. पण पोलीस आपल्या खाजगी मोबाईलने वाहन चालकांचे फोटो काढून त्यांच्यावर ई चालनची कार्यवाही करतात. वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी एक आदेश जारी करून पोलीसांनी खाजगी मोबाईलचा वापर न करता ई चालन मशीनचाच वापर करून वाहन चालकांचे मोटार वाहन कायदा तोडल्यानंतरचे फोटो काढावेत असे सांगितले आहे. ई चालन करतांना स्वत:च्या खाजगी मोबाईलचा वापर करतील अशा पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर योग्यती कार्यवाही करावी असे या पत्रात नमुद आहे.
वाहतुक विभागातील अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने 1 सप्टेंबर 2022 रोजी जारी केलेल्या एका पत्रानुसार राज्यभरात कसुरदार वाहन चालकांवर दंडात्मक कार्यवाही करतांना त्यांचे फोटो काढण्याची सुविधा ई चालान मशीनद्वारे प्राप्त झाली. पण प्रत्यक्षात काही पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे आपल्या खाजगी मोबाईल मार्फत कसुरदार वाहनचालकांचे फोटो काढतात आणि नंतर ते ई चालन मशीनमध्ये अपलोड करतात. त्यात संपुर्ण गाडीचा फोटो नसतो तर फक्त नंबर प्लेटचा असतो. त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखता येत नाही. या सर्व प्रकारांमुळे अनेक गोंधळ तयार होतात.
या सर्व परिस्थितीत अपर पोलीस महासंचालक वाहतुक कुलवंत कुमार सारंगल यांनी आदेश जारी केला आहे की, कसुरदार वाहन चालकांचे फोटो, चित्रीकरण करण्यासाठी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी स्वत:चा खाजगी मालकीचा मोबाईल न वापरता फक्त ई चालन मशीनचाच वापर करावा. ई चालन मशीनमध्ये कांही समस्या असतील, कांही अडचणी आल्यास त्यासाठी मे. क्रीश इनस्ट्राट्रेड प्रा.लि.यांच्या जिल्हाप्रतिनिधीकडून त्यांच्या तक्रारीचे निवारण करून घ्यावे. राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांना हा आदेश पाठविण्यात आला आहे. त्यात कोणी पोलीस अधिकारी किंवा पोलीस अंमलदार खाजगी मोबाईल वापरून कसुरदार वाहनांची फोटो काढत असेल, चित्रीकरण करत असेल तर त्या पोलीसाविरुध्द घटकप्रमुखांनी योग्य ती कार्यवाही करावी असेही या आदेशात लिहिलेले आहे.
खाजगी मोबाईलद्वारे कसुरदार वाहन चालकांचे फोटो आता काढता येणार नाहीत