ढवळे कॉर्नर येथील वाईन शॉप मॅनेजर यांचा खून

नांदेड,(प्रतिनिधी)- सिडको येथील ढवळे कॉर्नर जवळ असलेल्या विदेशी दारू दुकानातील सेवकांना मारहाण करून एकाच खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली आहे.या दारू दुकानाचे मालक संदीप सुभाषराव चिखलीकर हे आहेत. नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोन नावांसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.खून केल्याची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

सिडको भागात प्रदीप वाईन शॉप नावाचे दारू विक्रीचे दुकान आहे. या दुकानाचे मालक संदीप सुभाषराव चिखलीकर हे आहेत.या दुकानात साईनाथ जळबाजी गुडमलवार दामोदर पुट्ठेवाड,माणिकराव कापरतवार असे काम करणारे अनेक व्यक्ती आहेत. या दुकानाचे व्यवस्थापक माधव जीवनराव वाकोरे हे आहेत.सकाळी १० ते रात्री १० हे दारूचे दुकान उघडे असते.

काल दिनांक १ सप्टेंबर २०२२ रात्री ८.३० वाजता प्रदीप वाईन्स या दुकानावर साई इंगळे हा युवक आला आणि त्याने टुबर्ग बियरची मागणी केली.त्या नावाची ती बियर नसल्याचे दुकानातील लोकांनी त्यांना सांगितले.तेव्हा साई इंगळे म्हणाला माझ्या पसंदीची बियर नाही काय ? मग दुकान बंद करा असे सांगून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरु केली.दारूच्या दुकानावर असे नेहमीच घडत असते म्हणून दुकानातील लोकांनी त्याची काही दखल घेतली नाही.पण रात्री ९.३० वाजेच्या सुमारास साई इंगळे आणि इतर चार पाच जण परत प्रदीप वाईन्सवर आले तेव्हा साई इंगळे पगडी बांधलेल्या एकाला सांगत होता. पम्या भाई इनको जिंदा नही रखना है.त्याचे पूर्ण नाव प्रेमसिंघ सपुरे असे आहे.

आलेल्या सर्वानी दारू दुकानाचे लोखंडी गेट बळजबरीने काढून आत प्रवेश केला.एकाला अगोदर आणि नंतर दुसऱ्याला असे बाहेर ओढून लाकडी बॅटने मारहाण केली.नंतर दुकानाचे मॅनेजर माधव जीवनराव वाकोरे यांना मागील बाजूने उजव्या भकाळीत खंजीरने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. माधव जीवनराव वाकोरे हे रक्तबंबाळ अवस्थेत तेथे पडले.तेव्हा हल्लेखोर आप आपल्या दुचाकी गाड्यांवर बसून पळून गेले.

जखमी माधव जीवनराव वाकोरें यांना इतरांनी ऑटोत रुग्णालयात नेले पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू अगोदरच झाला होता. या घटनेची सर्व चित्रफीत सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.याबाबतची तक्रार साईनाथ जळबाजी गुडमलवार यांनी दिल्या नंतर नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्य कठोर,मागील दीड वर्षांपासून तोंडी आदेशावर कार्यरत पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांच्या आदेशाने गुन्हा मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा क्रमांक ५३६/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३०७,४५२,२९४,१४३,१४७ सोबत भारतीत हत्यार कायदा कलम ४/२५,४/२७ आणि मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक विजय पाटील हे करणार आहेत. आज सकाळी मयत माधव जीवनराव वाकोरे (32)  यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे. तेथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

व्हाट्स अप संकेतस्थळावर व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेज बातमी सोबत जोडले आहेत

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *