नांदेड(प्रतिनिधी)-24 ऑगस्ट रोजी एका 32 वर्षीय युवकाच्या पोटात चाकु खुपसून त्याच्यावर जिवघेणा हल्ला झाला होता. दुर्देवाने काल दि.2 सप्टेंबर रोजी जखमी युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
दि.24 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास गणेशनगर रस्त्यावर विक्की सुखदेव पोटभरे (32) रा.जयभिमनगर नांदेड हे जात असतांना अनिकेत उर्फ सोनु सुरेश गायकवाड (20), बिट्टू संघरत्न लोखंडे (26) आणि सतिश विश्र्वनाथ वंजारे या तिघांशी जुन्या कारणावरुन वाद झाला. त्यावेळी तुला जीवंतच सोडत नाही असे म्हणून अनिकेत उर्फ सोनु सुरेश गायकवाड या युवकाने विक्की पोटभरेच्या पोटात खंजीर खुपसला. त्यावेळी विक्कीचा मित्र प्रदीप बंडू आढाव हा सोडवायला आला असतांना इतरांनी त्यांच्या हातातील धार-धार शस्त्रांनी प्रदीपवर हल्ला केला. त् याच्या पाठीवर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
याप्रकरणी विक्की पोटभरेने दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी अनिकेत गायकवाड, बिट्टू लोखंडे आणि सतिश वंजारेविरुध्द गुन्हा क्रमांक 326/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे. आता काल दि.2 सप्टेंबर रोजी जखमी असलेल्या विक्की पोटभरेचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे या प्रकरणामध्ये आता भारतीय दंड संहितेचे कलम 302 वाढणार आहे. तीन आरोपींच्या शोधासाठी शिवाजीनगर पोलीस परिश्रम घेत आहेत.