नांदेड(प्रतिनिधी)-गणेशनगर वाय पॉईंटजवळ विक्की पोटभरेच्या पोटात खंजीर खुपसून त्याच्या खून करणार्या तीन जणांपैकी एकाला शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
दि.२४ ऑगस्ट रोजी गणेशनगर वाय पॉईंटजवळ विक्की सुखदेव पोटभरे (३२) यास अनिकेत उर्फ सोनु सुरेश गायकवाड (२०) याने पोटात खंजीर खुपसून त्याला जबर मारहाण केली होती. सुरूवातीला हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ नुसार दाखल झाला होता. या खुन प्रकरणात तीन जणांची नावे आरोपी या सदरात होती. उपचारादरम्यान विक्की सुखदेव पोटभरेचा मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हा क्रमांक ३२८ मध्ये भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ ही वाढ झाली. याप्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, रोड, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे या पथकाने मारेकर्यांचा शोध अनेक जागी घेतला. तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्याच्या आरमोर येथै मारेकरी अनिकेत उर्फ सोनु सुरेश गायकवाड असल्याचे माहिती पोलीसांना प्राप्त झाली आणि त्यानुसार पोलीस पथकाने तेथुन त्यास पकडून आणले. खून प्रकरणायतील मारेकर्याला अत्यंत जलदगतीने जेरबंद करणार्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी कौतुक केले आहे.
अनिकेतला पोलीस कोठडी
विक्की सुखदेव पोटभरेचा खून करणारा अनिकेत उर्फ सोनु सुरेश गायकवाड यास आज सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे आणि त्यांच्या सहकार्यांनी न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सादरीकरण केले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी अनिकेत उर्फ सोनु सुरेश गायकवाडला ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.